
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गाव आणि त्या गावाने सोसलेली अस्मानी सुलतानी... पाऊस पडावा म्हणून वरुण राजाची प्रार्थना करून गाढ झोपलेल्या ग्रामस्थांवर त्याच रात्री अतिवृष्टीने काळ बनून घाला घातला. अवघ्या काही वेळात संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या कल्पनेपलीकडच्या आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, नुकताच या चित्रपटाचा अधिकृत टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
सिनेमाची कथा पूर्णतः सत्यघटनेवर आधारित आहे. दिग्दर्शक राजू राणे यांनी या चित्रपटाच्या लेखनापूर्वी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्याकडून अचूक माहिती आणि अनुभव जाणून घेत कथेची मांडणी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या भयावह घटनेमुळे अनेकांची भावी आयुष्याची स्वप्ने कशी धुळीस मिळाली, याचे अत्यंत भावनिक आणि वास्तववादी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण बदलापूर येथे झाले आहे. कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी तेथे उभा केलेला माळीण गावचा सेट हा या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे. दमदार स्टारकास्ट, उत्कृष्ट व्हीएफएक्स आणि दर्जेदार संगीत ही या चित्रपटाची मुख्य बलस्थाने असून, केवळ टीझर पाहतानाही अंगावर शहारे येतात.
ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर रुपेश राणे, अरूण कोंजे, दत्तात्रय गायकर, राजु राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शन चे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे व राजु राणे यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे अशा उत्तम कलावंतांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. राजा फडतरे यांनी छायांकन, युवराज गोंगले यांनी गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केले असून अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी व हरिदास शिंदे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कला नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांचे असून महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत.