
येत्या शुक्रवारी, म्हणजेच १२ जून रोजी नेटफ्लिक्स, जिओहॉटस्टार आणि इतर प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मनोरंजनाचा मोठा धमाका होणार आहे. सस्पेन्स थ्रिलर, क्राईम ड्रामा ते रिअल-लाईफ डॉक्युमेंट्री अशा एकापेक्षा एक सरस कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अली फजलचा मुख्य अभिनय असलेला ‘राख’ आणि मल्याळम क्राईम थ्रिलर ‘दृढम्’ यांसारख्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्सचा यात समावेश आहे.
दृढम् । जिओहॉटस्टार
इदुक्कीच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हा एक थरारक मल्याळम क्राईम थ्रिलर आहे. शांत ठिकाणी बदली होईल या आशेने आलेल्या सब-इन्स्पेक्टर विजय राधाकृष्णन (शेन निगम) यांच्या आयुष्यात एक कुजलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजते. त्यातच एका बँकेवर दरोडा पडतो आणि गुन्ह्यांची मालिकाच सुरू होते. वरिष्ठांचा वाढता दबाव आणि वेगाने सरकणारी वेळ, या चक्रव्यूहातून विजय गुन्हेगारांपर्यंत कसा पोहोचतो, याची ही उत्कंठावर्धक कथा आहे.
शेल्टर । लायन्सगेट प्ले
हॉलिवूडचा डॅशिंग स्टार जेसन स्टेथम यात मायकल मेसन या माजी ‘एम१६’ एजंटच्या भूमिकेत आहे, जो स्कॉटलंडच्या एका दुर्गम बेटावर एकांतात राहत असतो. मात्र, एका भीषण वादळात आपल्या अनाथ भाचीचा जीव वाचवण्यासाठी तो स्वतःचा जीव धोक्यात घालतो. दरम्यान, काही घातक सशस्त्र मारेकरी त्यांच्या मागावर त्या बेटावर पोहोचतात. आता फक्त स्वतःच्या जुन्या कौशल्यांच्या जोरावर मायकलला स्वतःचा आणि भाचीचा जीव वाचवायचा आहे. या चित्रपटात बिल नाय, नाओमी अकी आणि हॅरिएट वॉल्टर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
मॅटर्नल इन्स्टिंक्ट। नेटफ्लिक्स
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या खऱ्या गुन्ह्यावर आधारित ही एक 'ट्रू-क्राईम' डॉक्युमेंट्री आहे. २०२० मध्ये टेक्सासमध्ये झालेल्या २१ वर्षीय रीगन सिमन्स-हॅनकॉकच्या हत्येचे रहस्य यात उलगडण्यात आले आहे. टेलर पार्कर नावाच्या महिलेने आपले नाते टिकवण्यासाठी गरोदर असल्याचे खोटे नाटक केले आणि शेवटी एका गर्भाचे अपहरण करण्यासाठी कोणत्या थराला जाऊन हा क्रूर गुन्हा केला, याचे अत्यंत थरारक चित्रण यात पाहायला मिळेल.
राख। ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ
१९७८ मधील गाजलेल्या ‘गीता आणि संजय चोप्रा’ अपहरण प्रकरणावरून प्रेरित असलेला हा एक गडद इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर आहे. नवखा पोलीस अधिकारी जयप्रकाश (अली फजल) देशातील अत्यंत क्रूर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एका मोहिमेवर निघतो. या तपासादरम्यान त्याला हिंसाचार, मानसिक आघात आणि मानवी क्रूरतेच्या भीषण वास्तवाचा सामना करावा लागतो. अली फजलचा एक वेगळा अंदाज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
द पॉलिगॅमिस्ट । नेटफ्लिक्स
झिम्बाब्वेच्या प्रसिद्ध लेखिका सू न्याथी यांच्या कादंबरीवर आधारित ही मालिका जॉयस गोमोरा (गुगु गुमेदे) या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरभोवती फिरते. जॉयसचे सुखी वैवाहिक आयुष्य अचानक उद्ध्वस्त होते, जेव्हा तिला समजते की तिच्या पतीचे (जोनासी) तिच्याशिवाय आणखी एक पत्नी, एक प्रेयसी आणि एक मिस्ट्रेस आहे. या धक्कादायक खुलाशानंतर पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठेसाठी सुरू होणारा संघर्ष यात मांडण्यात आला आहे.
मै वापस आऊंगा । थिएटर्स
‘अमर सिंग चमकिला’च्या प्रचंड यशानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अली आणि अभिनेता दिलजीत दोसांझ ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. १९४७ च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा एक भावूक आणि ऐतिहासिक रोमँटिक ड्रामा आहे. प्रेम, स्थलांतर आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध या संकल्पनेवर हा चित्रपट आधारलेला आहे. यात एका वृद्ध व्यक्तीने आपल्या नातवाला सांगितलेली भूतकाळातील प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात दिलजीतसोबतच नसीरुद्दीन शाह, वेदांग रैना आणि शरवरी वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
भारत भाग्य विधाता: द अनसीन हिरोज। थिएटर्स
मनोज तपकिरे दिग्दर्शित हा चित्रपट २००८ मधील मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. हल्ल्याच्या त्या काळरात्री कामा हॉस्पिटलमधील परिचारिका (नर्सेस) आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुमारे ४०० रुग्णांचे प्राण कसे वाचवले, या शौर्याची ही अनकही कथा आहे. या चित्रपटात कंगना रणौत, गिरिजा ओक आणि स्मिता तांबे या कसलेल्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर । थिएटर्स
चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘गव्हर्नर’ हा चित्रपट १९९१ मधील भारताच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला एक थरारक राजकीय-आर्थिक ड्रामा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन गव्हर्नर एस. वेंकिटरमणी यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला आहे. यात अभिनेते मनोज बाजपेयी हे ‘ए. रामनन’ ही मुख्य भूमिका साकारत असून, भारताला आर्थिक दिवाळखोरीतून वाचवण्यासाठी पडद्यामागे केलेल्या अथक प्रयत्नांचा रंजक प्रवास यात मांडण्यात आला आहे.