Home >> सिनेवार्ता >> ‘ईठा’ च्या टी्झरचा सोशल मीडियावर धुमाकुळ

‘ईठा’ च्या टी्झरचा सोशल मीडियावर धुमाकुळ

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
24th June, 09:04 pm
‘ईठा’ च्या टी्झरचा सोशल मीडियावर धुमाकुळ

‘स्त्री’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आता एका अत्यंत आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित असलेल्या तिच्या बहुप्रतीक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरने रिलीज होताच सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, श्रद्धाच्या लूकने चाहत्यांना थक्क केले आहे.
दोन मिनिटांहून अधिक कालावधीच्या या टीझरमध्ये श्रद्धा कपूरचा संपूर्ण कायापालट पाहायला मिळत आहे. टीझरमधील ‘पड़ी-पड़ी मरी तो बेचारी, नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’ हा श्रद्धाच्या आवाजातील दमदार संवाद प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो आणि अंगावर शहारे आणतो. पारंपरिक नऊवारी साडी, पायांतील घुंगरू, लावणीचा ठसका, डोळ्यांतील अंगार आणि पात्रातील वेदना श्रद्धाने अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर जिवंत केल्याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.
हा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीतील थोर तमाशा कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकतो. आपल्या अमोघ कलेच्या जोरावर लावणीला एक नवी प्रतिष्ठा आणि ओळख मिळवून देणाऱ्या विठाबाईंना १९९० मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. कलाकाराचे रंगीबेरंगी जग आणि त्यामागील वास्तव, आर्थिक चढ-उतार तसेच विठाबाईंनी समाजाशी दिलेल्या लढ्याची थक्क करणारी कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरची झालेली निवड अत्यंत योग्य मानली जात आहे, कारण श्रद्धाला मराठी संस्कृतीची उत्तम जाण आहे. श्रद्धाची आई शिवांगी कोल्हापुरे या मराठी असून, श्रद्धाचा संबंध भारतीय संगीत जगतातील दिग्गज मंगेशकर कुटुंबाशीही आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाशी तिचे नाते अधिक घट्ट आहे, जे तिच्या अभिनयातून स्पष्टपणे उमटताना दिसत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन ‘छावा’फेम लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर, रणदीप हुड्डा आणि मोहम्मद झीशान अयूब यांच्या प्रमुख भू्मिका आहेत. चित्रपट २८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.
दमदार पार्श्वसंगीत, भव्य सिनेमॅटोग्राफी आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा आत्मा जपणाऱ्या ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा कमालीच्या वाढल्या आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास चित्रपट विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.