
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा बुधवारी १८ वा दिवस असून, त्यांची प्रकृती खालावू लागल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शबाना आझमी, झीनत अमान, अभय देओल आणि अतुल कुलकर्णी यांच्यासह बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, त्यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे भावनिक आवाहनही या कलाकारांनी केले आहे.
सोनम वांगचुक हे गेल्या २८ जूनपासून दिल्लीत बेमुदत उपोषणावर बसले आहेत. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ तर्फे आयोजित या आंदोलनात ते सहभागी झाले आहेत. ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे. आंदोलनाच्या आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १८ दिवसांत वांगचुक यांचे वजन तब्बल साडेआठ किलोने घटले असून त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
शबाना आझमी यांनी म्हटले आहे की, आपल्या देशाला तुमच्यासारख्या सत्य आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणाऱ्या व्यक्तीची नितांत गरज आहे. हा लढा सुरू ठेवण्यासाठी तुमचे निरोगी राहणे आवश्यक आहे, त्यामुळे कृपया आपले उपोषण मागे घ्यावे.
अतुल कुलकर्णी यांनी तरुणांना आवाहन करताना त्यांनी लिहिले, आपल्याला प्रामाणिकपणा आणि करुणेच्या जोरावर या देशाला नव्याने घडवायचे आहे. मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत.
झीनत अमान यांनी केंद्र सरकारला या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. सरकारने वांगचुक यांच्याशी शांततापूर्ण चर्चा करून या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा, असे सांगत त्यांनी वांगचुक यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव केला.
ओमी वैद्य (चतुर – ३ इडियट्स) मला ‘फुंसुख वांगडू’चा मृत्यू नको आहे, अशा शब्दांत ओमी वैद्यने आपली चिंता व्यक्त केली. ‘३ इडियट्स’ चित्रपटातील ‘फुंसुख वांगडू’ ही व्यक्तिरेखा सोनम वांगचुक यांच्यावरच प्रेरित असल्याचे सांगत त्याने त्यांच्या नम्र आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले.
त्यांचे (सोनम वांगचुक यांचे) जीवन अत्यंत अमूल्य आहे, असे लिहीत दिया मिर्झाने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी वांगचुक यांच्या धाडसाचे कौतुक करत, या गंभीर परिस्थितीवर प्रशासनाकडून दाखवल्या जाणाऱ्या उदासीनतेवर आणि मौनावर कडक शब्दांत टीका केली आहे.
अभय देओलने वांगचुक यांचा उपोषणस्थळावरील फोटो शेअर करत ‘ब्रोकन हार्ट’ इमोजीसह आपली संवेदना व्यक्त केली आहे.