Home >> सिनेवार्ता >> ‘सतल​ज’ चित्रपट ‘झी फाईव्ह’वरून गायब

‘सतल​ज’ चित्रपट ‘झी फाईव्ह’वरून गायब

सुरक्षेच्या कारणास्तव कारवाई : दिलजीत दोसांझची होती प्रमुख भूमिका

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
‘सतल​ज’ चित्रपट ‘झी फाईव्ह’वरून गायब

मुंबई : तीन वर्षांनंतर ‘सतलज’ (Satluj) हा अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) चित्रपट ‘झी फाईव्ह’वर (zee5) प्रदर्शित झाला. मात्र अचानक सुरक्षेच्या कारणास्तव तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. आता पुढील आदेशापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना भारतात पाहता येणार नाही. 

यावर दिलजीत दोसांझसोबतच दिग्दर्शक हनी त्रेहान आणि चाहत्यांकडूनही तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा चित्रपट का हटवला गेला, त्यात असे आहे तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे. यादरम्यान आता सरकार सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपट हटवण्यात आल्याचा दावा करत आहे. या चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. या वादात कलाकारांपासून राजकारण्यांनीही उडी घेतली आहे. ‘सतलज’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता आणि सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रतीक्षा करत होता. 

ओटीटी प्लॅटफॉर्म्सना या मार्गदर्शक तत्त्वांचं जबाबदारीने पालन करण्यास सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्याने पुढे असेही सांगितले की, हा चित्रपट ‘पंजाब ९५’ या नावाने २०२२ मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यासाठी त्यात तब्बल १२७ कट्स सुचवले होते. हे कट्स स्वीकारण्यास निर्मात्यांनी नकार दिला आणि त्यामुळे प्रदर्शन लांबणीवर गेले.

त्यावेळी सुचवलेल्या कट्सवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. नंतर हा चित्रपट एका नवीन शीर्षकासह गुपचूप ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. ओटीटी प्लॅटफॉर्म सेन्सॉर बोर्डाच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत. जेव्हा हे प्रकरण सरकारच्या निदर्शनास आले, तेव्हा त्यानी ‘झी फाईव्ह’ला तो चित्रपट काढून टाकण्यास सांगितले, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दिलजीतचा ‘सतलज’ हा चित्रपट मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा (Jaswant Singh Khalra) यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांनी १९८४ ते १९९४ दरम्यान पंजाबमध्ये हजारो अज्ञात व्यक्तींच्या बेपत्ता होण्याच्या आणि त्यांच्या कथित अंत्यसंस्कारांच्या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांच्या तपासामुळे हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते.

१९९५ मध्ये जसवंत सिंग खालरा यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह नदीत फेकून देण्यात आला होता. २००५ मध्ये पंजाब पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांना खालरा यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता चित्रपट अचानक ओटीटीवर काढल्यानंतर दिग्दर्शक हनी त्रेहान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.