१५ जुलैपासून एआय कॅमेऱ्यांतून मिळणार ई-चलन

पणजी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई १५ जुलैपासून सुरू होणार आहे. सध्या राज्यातील २६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या एआय कॅमेऱ्यांमध्ये दररोज सरासरी २० हजारांहून अधिक वाहतूक नियमभंगाची नोंद होत असल्याची माहिती वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यात सध्या २६ ठिकाणी एआय कॅमेरे कार्यरत आहेत. हे कॅमेरे सुरू असले तरी अद्याप दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. मात्र, वाहनचालकाने नियम मोडल्यास संबंधित वाहनाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर त्याबाबतचा संदेश जातो.
राज्यातील २६ ठिकाणी एआय कॅमेऱ्यांच्या आधारे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
४ जुलै रोजी एकाच दिवशी तब्बल ५६,३५६ वाहतूक नियमभंगाची नोंद झाली होती. त्याच्या आदल्या दिवशी, ३ जुलै रोजी २६,९५४ नियमभंगाची प्रकरणे समोर आली होती. या आकडेवारीचा विचार करता, एआय कॅमेऱ्यांद्वारे दररोज सरासरी २० हजारांपेक्षा अधिक उल्लंघने नोंदविली जात आहेत.
एआय कॅमेऱ्यांद्वारे सीट बेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे (ओव्हरस्पीडिंग) तसेच हेल्मेट न घालणे यांसारखे नियमभंग सहजपणे ओळखले जात आहेत.
सध्या २६ ठिकाणी एआय कॅमेरे बसविण्यात आले असून, सप्टेंबरपर्यंत ही संख्या ५२ आणि डिसेंबरअखेर ९२ ठिकाणांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक नियमभंगाची नोंद आणि दंडात्मक कारवाईचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अनेक वाहनचालक सीट बेल्टचा वापर करत नाहीत. वाहतूक पोलीस दिसल्यानंतरच ते वाहन थांबवून सीट बेल्ट लावतात. तसेच काही जण पोलिसांना पाहून मोबाईलवर बोलणे थांबवतात. मात्र, एआय कॅमेरे नजरेआड राहत नसल्याने वाहन चालविताना सीट बेल्ट न लावणे किंवा मोबाईलवर बोलणे यांसारखे नियमभंग सहजपणे कॅमेऱ्यात कैद होतात, असे वाहतूक खात्याचे संयुक्त संचालक बी. ए. सावंत यांनी सांगितले.