कदंब महामंडळाचा निर्णय

पणजी : गोवा विद्यापीठात (Goa University) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी कदंब परिवहन महामंडळाने (Kadamba Transport Corporation) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध तालुका मुख्यालयांमधून पणजी मार्गे गोवा विद्यापीठापर्यंत थेट बससेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
येत्या एका महिन्यात चार बस मार्गांवर उतरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी दिली. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विद्यार्थी विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या अडचणींबाबत कदंब महामंडळाकडे निवेदन सादर केले होते. गोवा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा तीन ते चार बस बदलून प्रवास करावा लागत असतो. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून थेट बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
यावर प्रतिक्रिया देताना रोहन कासकर म्हणाले की, सत्तरी, धारबांदोडा, सांगे आणि काणकोण या भागांतून पणजी बसस्थानकापर्यंत थेट बससेवा सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. नवीन इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल झाल्यानंतर सध्या उपलब्ध असलेल्या ५० आसनी डिझेल बस या मार्गांवर वळविण्यात येणार आहेत.
कासकर यांनी स्पष्ट केले की, या बस केवळ विद्यार्थ्यांसाठी राखीव नसून सर्वसामान्य प्रवाशांनाही त्यांचा लाभ घेता येईल. तसेच पणजी बसस्थानकातून गोवा विद्यापीठापर्यंत स्मार्ट सिटीच्या इलेक्ट्रिक बस दर १० ते १५ मिनिटांनी धावत असल्याने विद्यार्थ्यांनी त्या सेवांचाही वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, काणकोण, धारबांदोडा, सांगे आणि वाळपई येथून थेट पणजी बसस्थानकापर्यंत सेवा सुरू करण्यावर सध्या भर आहे. पुढील टप्प्यात गोवा विद्यापीठापर्यंत थेट बस धावण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे संकेत कदंब महामंडळाकडून देण्यात आले आहेत.