शेतीत न उतरणाऱ्या ट्रॅक्टर चालकांचे निलंबन करणार

पणजी : विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी (Agriculture officer, Goa) कार्यालयात बसून नव्हे तर शेतीत जाऊन काम करणे गरजेचे आहे. शेतीत जाऊन शेतीची पाहणी करण्याबरोबरच पंचायतींमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केले. शेतीत न उतरणाऱ्या ट्रॅक्टर चालकांचे आजच निलंबन करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
साखळी रवींद्र भवनात मंगळवारी ‘कृषी पे चर्चा’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी खात्याचे संचालक चंद्रहास नाईक देसाई तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
विकसित भारत तसेच विकसित गोव्याचे स्वप्न शेतकऱ्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी शेतीचे प्रमाण वाढण्यासहीत शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. गोवा सरकारने स्वयंपूर्ण गोवा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे शेती तसेच भाज्यांचे उत्पादन वाढायला लागले आहे.
गेली सात वर्षे शेतीचे प्रमाण वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी विविध सवलती सुरू झाल्या आहेत. ट्रॅक्टर चालकाची शेतीत उतरण्याची तयारी नाही. तो बसून राहतो, अशी तक्रार आताच माझ्याकडे आली आहे. त्याचे नाव सांगितल्यानंतर आजच त्याला मी निलंबित करतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यात १८ हजार हेक्टर खाजन शेती आहे. ही शेती पुनरूज्जीवित करण्याचा प्रस्ताव आहे. जागतिक बॅंक आणि केंद्र सरकारच्या मदतीने गोवा सरकार खाजन शेती पुनरूज्जीवित करण्याचा आराखडा तयार करणार.
‘त्या’ ट्रॅक्टर चालकांवर कारवाई होणार
कृषी खात्याचे काही ट्रॅक्टर चालक मुद्दाम ट्रॅक्टर नादुरूस्त करतात आणि बसून राहतात. हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. या प्रकारांवर कारवाई होणार. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची सरकारची तयारी आहे. अर्ज केल्यानंतर १५ दिवसांच्या आत ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळणार. एकट्याने शेती करणे परवडत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मर्स क्लब स्थापन करायला हवेत. एकत्र आल्यानंतर शेती करणे सोपे व लाभकारी ठरते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.