
मडगाव: काँग्रेस पक्षात सध्या अंतर्गत वाद आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपवर नाहक टीका केली जात आहे. काँग्रेस सध्या पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत असल्यानेच भाजपवर असे बिनबुडाचे आरोप करत आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केली.
दामू नाईक यांनी पुढे सांगितले की, भाजप कोणत्याही नवीन पक्षाला निधी पुरवत नाही. नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी पैसा खर्च करण्याऐवजी, तो पैसा राज्यातील जनतेचे कल्याण आणि विकासासाठी खर्च करण्यास आमचे प्राधान्य आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि मतभेदांतून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच हे धादांत खोटे आरोप केले जात आहेत. मतविभाजनासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये दिले जात असल्याचा काँग्रेसचा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन आहे. काँग्रेसने आधी त्यांचा अंतर्गत वाद, तिकिटांसाठीची रस्सीखेच, एकमेकांवरील आरोप आणि गटबाजी मिटवावी. एखाद्या मोठ्या पक्षावर आरोप केले की प्रसिद्धी मिळते, याच एकमेव हेतूने काँग्रेसकडून अशी विधाने केली जात आहेत.
भाजप पक्ष हा संघटनेच्या माध्यमातून कार्य करतो. लोकांमध्ये भाजप सदैव कार्यरत आहे आणि जनतेला दाखवलेले जनकल्याणाचे स्वप्नही पक्षाने पूर्ण केले आहे. टीका करणारे त्यांचे काम करत राहतील; मात्र जिल्हा पंचायत निवडणुकांमध्येही विकास हाच महत्त्वाचा मुद्दा ठरत असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. केंद्रातील आणि राज्यातील 'डबल इंजिन' सरकारकडून कोट्यवधींचा निधी जनविकासासाठी खर्च केला जात आहे. त्यामुळे कोणताही नवीन पक्ष आला, तरी भाजपला काहीही फरक पडणार नाही. मागील ३२ वर्षांच्या सक्रिय राजकारणात अनेक पक्ष आले आणि गेले, हे आम्ही पाहिले आहे," असेही नाईक म्हणाले.
भाजपमध्ये अंतर्गत वाद नाहीत
भाजपच्या सुरुवातीच्या काळात कोणीही तिकिटासाठी तयार होत नव्हते. मात्र, आता ज्या प्रकारे पक्षाचे काम सुरू आहे आणि लोकांना पक्षाचे कार्य आवडत आहे, ते पाहता तिकीट घेण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. पक्ष जसा वाढत गेला, तशी पक्षाचे तिकीट मागणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे; परंतु पक्षात अंतर्गत असे कोणतेही वाद नाहीत. निवडणुका साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात होतील. निवडणुकांना अजूनही आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे तिकीट कोणाला मिळणार याचे उत्तर योग्य वेळीच मिळेल. सध्यातरी कोणाला तिकीट द्यायचे की नाही, याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय आरक्षण हा एसटी समाजाचा मूलभूत अधिकार
यासोबतच राज्यातील अनुसूचित जमाती (ST) समुदायाच्या आरक्षणाबाबत बोलताना दामू नाईक यांनी पक्षाची भूमिका मांडली. "एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून तो त्यांना मिळालाच पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात गोवा भाजप केंद्रीय पातळीवर सातत्याने आणि गांभीर्याने पाठपुरावा करत आहे. केंद्र सरकारकडून या समुदायाला लवकरच सकारात्मक न्याय मिळेल आणि आरक्षण लागू होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.