
पणजी: गोवा सरकारने (Goa Government) पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई भवनासाठी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भवन मंदिरापासून अवघ्या १.५ ते २ किमी अंतरावर आहे. पुढील पंढरपूर वारीपूर्वी हे भवन बांधून पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी दिली.
सोमवारी वारकरी दिंडी योजनेच्या अनुदान वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री रमेश तवडकर, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, खासदार सदानंद शेट तानावडे, खात्याचे संचालक नितीन नाईक, बाबू कवळेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंढरपूर येथील भवनाचे नाव विठ्ठल-रखुमाई अथवा गोवा पंढरपूर भवन असे ठेवण्यात येईल. याबाबत अंतिम निर्णय येथील वारकरी पथकांनी घ्यायचा आहे. भवनासाठी २ हजार चौरस मीटर जागा शोधण्यात आली आहे. भूखंड ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया या वारीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर पुढील वर्षीच्या वारीपूर्वी या भवनाचे उद्घाटन होईल. तेव्हा त्या भवनाचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मला पुन्हा एकदा संधी मिळेल असे मागणे मी देवाकडे करणार आहे.
ते म्हणाले, गोव्यात पोर्तुगीज शासनाच्या आधीपासून वारीची परंपरा सुरू आहे. अनेक भाविक येऊन १२ ते १४ दिवस चालत पंढरपूरला जातात. वारकरी पथकांनी आमच्याकडे कोणतीही मदत मागितली नव्हती. मात्र आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन ही योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत चाळीसहून अधिक वारकरी असणाऱ्या पथकांना १ ते ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. यंदा राज्यभरातील ३६ पथकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ३५०० हून अधिक वारकऱ्यांचा समावेश आहे. योजनेअंतर्गत दिलेले अर्थसहाय्य दोन दिवसात पथकांच्या बँक खात्यात जमा होईल.
पुढील वर्षी अयोध्या तीर्थयात्रा योजना सुरू करणार
पुढील वर्षात अयोध्या तीर्थयात्रा योजना सुरू करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. साठ वर्षांच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल. अयोध्या येथील गोवा राम निवासासाठी भुखंड ताब्यात घेतला आहे. येथे नाममात्र शुल्क देऊन राहण्याची सोय होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.