Home >> गोवा >> व्हॉट्सॲपवर पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक

व्हॉट्सॲपवर पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक

कोरगावातील युवतीला ३.६९ लाखांचा फटका

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
व्हॉट्सॲपवर पार्टटाईम नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक

पेडणे : व्हॉट्सॲपवर घरबसल्या पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून कोरगाव येथील २५ वर्षीय युवतीची ३ लाख ६९ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (A 25-year-old woman from Korgaon was defrauded of ₹3,69,400 online after being lured with the promise of a part-time job from home via WhatsApp.). याप्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकात  अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी. पी. कोरगावकर (रा. देऊळवाडा, कोरगाव, पेडणे) यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करून घरातून करता येणाऱ्या पार्टटाईम नोकरीची ऑफर दिली. सुरुवातीला काही कामे पूर्ण केल्यानंतर त्यांना थोडी रक्कम देण्यात आली. त्यामुळे विश्वास बसून त्यांनी पुढील कामे स्वीकारली.

यानंतर कमावलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच, चुकीचा विथड्रॉवल पर्याय निवडल्याचे सांगून अतिरिक्त पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर बँक खात्याचा क्रमांक चुकीचा भरल्याचे कारण देत खाते 'अनफ्रीझ' करण्यासाठी २ लाख रुपये, तसेच क्रेडिट स्कोअर कमी असल्याचे सांगून आणखी २.४० लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आले.

वेगवेगळ्या कारणांनी पैसे भरत असताना एकूण ३,६९,४०० रुपये जमा केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे युवतीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी मांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

नागरिकांना आवाहन 

 सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सॲपवरद्वारे मिळणाऱ्या घरबसल्या नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे जमा करण्यापूर्वी संबंधीत माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा