Home >> देश -परदेश >> मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा दरड कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा दरड कोसळली

गेल्या २४ तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा दरड कोसळली

मुंबई : महाराष्ट्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.  अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. रायगड, रत्नागिरी, चिपळूण, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि पाली परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.  मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळील खवटी येथे रविवारी मध्यरात्रीनंतर मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. (A landslide on the Mumbai-Goa highway near Chiplun has stopped vehicle movement on both sides.)  गेल्या २४ तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी जेसीबी, पोकलीनसारखी यंत्रसामग्री अपुरी पडत असल्याने महामार्ग वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होईल, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे.

अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन 

सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी दरडी कोसळणे आणि पाणी साचल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवास करण्यापूर्वी वाहतुकीबाबतची अद्ययावत माहिती तपासण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

पाली शहर पाण्याखाली

रायगड जिल्ह्यातील अंबा नदीला आलेल्या पुरामुळे पाली-खोपोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर परिसर, एसटी बसस्थानक, भाजी मार्केट आणि शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

खोपोली-पेण मार्गही बंद

रायगडमध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सारसन ते इसांबा फाटा परिसरात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पाताळगंगा आणि भोगावती नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.‍

कल्याण-डोंबिवलीत जलमय परिस्थिती

कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कल्याण-शीळ मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असून डोंबिवलीतील अनंतम रीजेन्सी चौकात पाण्यामुळे दुचाकी आणि लहान वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील उड्डाणपुलाला भगदाड

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटीजवळील विवळवेढे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुलावरील काँक्रीट तुटून लोखंडी सळ्या बाहेर आल्यामुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी १५ हून अधिक वाहनांचे टायर फुटल्याच्या घटनाही घडल्या होत्या.

आळंदीत इंद्रायणी नदीला पूर

आळंदीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत दाखल होण्याची शक्यता असताना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या चाकणच्या बाजूने जाणारा मार्गच वाहतुकीसाठी उपलब्ध असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



हेही वाचा
सर्व पहा