वास्कोतील जीर्ण इमारतीचा भाग कोसळल्यानंतर आमदारांनी केली पाहणी

पणजी : गोव्यातील वास्को शहरात एका जुन्या आणि जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनवणाऱ्या इमारत मालकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला.
वास्कोचा प्रसिद्ध 'सप्ताह' उत्सव अगदी तोंडावर असल्याने, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित मालकांनी ही इमारत स्वतःहून पाडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शहरातील इतर जीर्ण इमारतींचा प्रश्न अजूनही कायम असून, यावर पालिकेने आणि प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
आमदार कृष्णा साळकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ज्या इमारती राहण्यासाठी किंवा वापरासाठी अत्यंत धोकादायक बनल्या आहेत, त्यांच्या मालकांनी वेळेत दुरुस्ती करणे किंवा त्या सुरक्षित करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. असे न करता नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. केवळ मालकांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप पादचारी आणि वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागणे अत्यंत दुर्दैवी आहे.
कोणतीही मोठी जीवितहानी किंवा दुर्घटना घडण्यापूर्वीच पालिकेने अशा सर्व धोकादायक वास्तूंचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. आता केवळ नोटिसा बजावून न थांबता, थेट कारवाई करण्याची मानसिकता प्रशासनाने दाखवावी, जेणेकरून वास्को शहर सर्वांसाठी सुरक्षित राहील, असे मत सर्वसामन्यांतून व्यक्त होत आहे.