Home >> गोवा >> मये परिसरात बिबट्याचा वावर, कुत्र्यावर केला जीवघेणा हल्ला

मये परिसरात बिबट्याचा वावर, कुत्र्यावर केला जीवघेणा हल्ला

कुत्रे गंभीर जखमी, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
8 hours ago
मये परिसरात बिबट्याचा वावर, कुत्र्यावर केला जीवघेणा हल्ला

पणजी : मये परिसरातील तीर्थबाग वाठारात शनिवारी रात्री लोकवस्तीत घुसून एका बिबट्याने पाळीव कुत्र्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात कुत्रे गंभीर जखमी झाले असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तीर्थबाग येथील रहिवासी राजन नाईक यांचे हे पाळीव कुत्रे आहे. शनिवारी रात्री कुत्रे घराच्या मागील बाजूस बांधलेले असताना अचानक ते जोरजोराने भुंकू लागले. कुत्र्याचा भुंकण्याचा आणि झटापटीचा आवाज ऐकून नाईक कुटुंबीयांनी तत्काळ घराच्या मागील बाजूस धाव घेतली. माणसांची चाहूल लागताच बिबट्याने कुत्र्याला सोडून जवळच्या जंगलात धूम ठोकली. कुत्रे साखळीला बांधलेले असल्याने बिबट्याला ते ओढून नेणे शक्य झाले नाही, तसेच कुटुंबीयांनी वेळीच धाव घेतल्याने कुत्र्याचा जीव वाचला.

बिबट्याने कुत्र्याच्या मानेचा घोट घेण्याचा प्रयत्न करत तिथे दात रुतवले होते. यामुळे कुत्र्याला खोल जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामुळे कुत्रे प्रचंड घाबरले असून, सध्या त्याने अन्न-पाणी सोडले आहे.

स्थानिकांची वन विभागाकडे मागणी

मये परिसरात बिबट्यांची संख्या आणि त्यांचा वावर वाढला असल्याची भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत. सुमारे चार-पाच वर्षांपूर्वीदेखील या भागात एका बिबट्याने थेट घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, अशी आठवण स्थानिकांनी सांगितली. आता पुन्हा बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर वाढल्याने लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने या घटनेची त्वरित दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा, बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा आणि नागरिकांना भयमुक्त करावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा