Home >> गोवा >> पर्वरीतील उड्डाणपुलाचे लोकार्पण सप्टेंबरमध्ये

पर्वरीतील उड्डाणपुलाचे लोकार्पण सप्टेंबरमध्ये

मुख्यमंत्री डॉ. सावंत : अंतिम सेगमेंट वर उचलण्याचे काम पूर्ण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 11:33 pm
पर्वरीतील उड्डाणपुलाचे लोकार्पण सप्टेंबरमध्ये

पणजी : पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या अंतिम सेगमेंट वर उचलण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले आहे. पुलाचे अन्य बांधकाम देखील वेळेत पूर्ण होत आहे. या उड्डाणपुलाचे लोकार्पण सप्टेंबर महिन्यात केले जाईल. यासाठी गणेश चतुर्थीपर्यंत तारीख ठरवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पर्वरी येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे व अन्य अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी अंतिम सेगमेंट क्रेनच्या सहाय्याने वर उचलण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले की, हा पूल केवळ पर्वरी अथवा गोव्यासाठी आहे असे नाही. या पुलामुळे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील असणारी पाच राज्ये जोडली जातील. पुलामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये अधिक जवळ येणार आहेत. या मार्गावरील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. पुलासाठी ८६ खांब, १४३१ सेगमेंट आणि ८७ स्पॅन घालण्यात आले आहेत. दक्षिणेकडील राज्यात जाणारी वाहने पुलावरून जातील. यामुळे पुलाखालील स्थानिक वाहतुकीचा खोळंबा कमी होण्यास मदत होणार आहे. स्थानिकांना देखील हा पूल उपयुक्त ठरणार आहे.
ते म्हणाले, २०१४ पूर्वी राज्यात पायाभूत विकास झाला नव्हता. पत्रादेवीपासून काणकोणपर्यंत जाण्यासाठी किमान चार तास लागत होते. मागील बारा वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. अनेक रस्ते, पूल बांधण्यात आले आहेत. हा उड्डाणपूल सुरू झाल्यावर पत्रादेवी ते काणकोण हा प्रवास दीड तासांत करणे शक्य होणार आहे. गोव्यातील हा विकास केवळ भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळे शक्य झाले आहे. केंद्राने गोव्यातील पायभूत सुविधांच्या विकासासाठी आतापर्यंत ४० हजार कोटी रुपयांहून अधिक निधी दिला आहे. यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानतो.
उद्घाटनापूर्वी दोन दिवस लोकांना ‘सेल्फी’ची संधी
उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याच्या दोन दिवस आधी तो सर्वसामान्य जनतेला पाहण्यासाठी खुला केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या दोन दिवसांत नागरिक पुलावर येऊन फिरू शकतात आणि सेल्फी घेऊ शकतात. त्यानंतर मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर पादचाऱ्यांना बंदी असेल आणि केवळ वाहनांनाच प्रवेश दिला जाईल.

काही राजकारण्यांनी पुलाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जनतेला भाजपने केलेला विकास माहीत आहे. म्हणूनच लोक आमच्या पाठीशी राहिले आणि आम्हीही नेहमी लोकांच्या सोबतच राहू. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री      

हेही वाचा
सर्व पहा