मडगाव, फोंडा भागात झाड कोसळण्याच्या घटना

पणजी : राज्यात शनिवारी विविध भागात दिवसभर जोरदार पाऊस पडत होता. सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मडगाव भागात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काणकोण, फोंडा भागाला वादळासह आलेल्या पावसाचा मोठा फटका बसला. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करुन रस्त्यावर तसेच घरावर पडलेली झाडे हटवली.
वाळपई : सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसासह चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील २४ तासांत तालुक्याच्या विविध भागांत सुमारे २००० मिमी पर्जन्यवृष्टीची नोंद झाली. संध्याकाळच्या सत्रात काही भागांत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज वाहिन्यांची हानी झाली असून अनेक घरांवर झाडे पडून लाखोंचे नुकसान झाले.
अनेक गावांना मोठा फटका
ब्रह्मकरमळी, खडकी, भेडशीवाडा, भुईपाल, दाबे, हेदोडे, पाडेली, धामसे, म्हाऊस या भागांना चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला. या भागांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली, भिंती कोसळल्या तसेच घरगुती सामानाचे नुकसान झाले. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर धाव घेऊन रस्त्यावर पडलेली झाडे हटवली आणि अनेक घरांवरील झाडे काढून लाखोंची मालमत्ता वाचवली.
पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात येईल तसेच आवश्यक ठिकाणी घरांची दुरुस्ती करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वाळपई मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही नुकसानग्रस्तांना आवश्यक स्तरावर आर्थिक मदत व घरदुरुस्तीचे आश्वासन दिले आहे.
खडकी शिवाजीनगर येथील बुध हरिजन यांच्या घरावर जंगली झाड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. भेडशीवाडा-भुईपाल येथे आंब्याचे झाड कोसळले.
म्हाऊस पंचायत क्षेत्रातील दाबे येथील संगीता गावस यांच्या घरावर झाड पडून २० हजार रुपयांचे नुकसान झाले. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका धामसे व कोपार्डे येथे बसला. धामसे येथील सातेरी मंदिराजवळ वीज वाहिनीवर झाड पडून तारा तुटल्या व खांब मोडले. कोपार्डे धनगरवाडी रस्त्यावर अाकेशियाचे झाड पडून ३ खांब मोडले. यामुळे वीजपुरवठा ठप्प झाला होता. वीज खात्याचे सहाय्यक अभियंता अरविंद गावडे यांच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून सुमारे ४ तासांत वीजपुरवठा पूर्वपदावर आणला. ज्ञानेश्वर गावस यांच्या मार्गदर्शनाखाली अडथळे दूर करण्यात आले.
बाणावली, घोगळ, दवर्लीत झाडे पडण्याच्या घटना
मडगाव : मुसळधार पावसामुळे मडगाव आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसून, मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी पडलेली झाडे हटवून रस्ते मोकळे केले.
मडगाव अग्निशामक दलाला सासष्टीच्या विविध भागातून आपत्कालीन कॉल्स आले होते. बाणावली येथील विन्सेंट बारच्या मागे एका झाडाची मोठी फांदी वीज वाहिनीवर कोसळली होती. शुक्रवारी पहाटे कॉल मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी जात फांदी हटवली.
घोगळ येथील चिन्मय मठाजवळ सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठे जंगली झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घोगळ येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ झाड उन्मळून शेजारील घरावर पडण्याच्या स्थितीत होते तर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दवर्ली येथील मशिदीजवळ मोठे फणसाचे झाड मुळासकट उपटून घरावर पडण्याच्या धोकादायक स्थितीत होते. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून ही दोन्ही धोकादायक झाडे सुरक्षितपणे बाजूला केली.
तिस्क- उसगाव येथे झाड कोसळले
फोंडा : उसगाव पंचायत क्षेत्रातील टाकीवाडा आणी तिस्क- उसगाव येथे शनिवारी सकाळी दोन घरांवर झाडे कोसळून नुकसान झाले. टाकीवाडा येथे दिलीप मळकर्णेकर तर तिस्क- उसगाव येथे संगम पार्सेकर त्यांच्या घरावर झाडे कोसळल्यानंतर फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन झाडे बाजूला केली.
तिस्क- उसगाव येथील संगम पार्सेकर यांच्या घरावर तसेच शौचालयावर झाड कोसळले. घरातील मंडळी मागच्या खोलीत राहिल्याने सुखरूप बचावली. मात्र शौचालय तसेच घराच्या छपराचे नुकसान झाले. अंदाजे ३० हजारांपेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा दावा घर मालकाने केला आहे.
टाकीवाडा येथील दिलीप मळकर्णेकर यांच्या घरावर सकाळी झाड कोसळले. त्यामुळे छपरावरील सिमेंटचे पत्रे फुटून गेल्याने पावसाचे पाणी घरात शिरले. झाड कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन झाड बाजूला केले.
दरम्यान, कुमयाकडे- उसगाव येथील मुख्य रस्त्यावर शनिवारी दुपारी झाड कोसळले. त्यामुळे वाहतुकीवर काहीवेळ परिणाम झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पाटणेत घरावर झाड पडून हानी
पैंगीण : काणकोण तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. पाटणे-कोळंब येथील रहिवासी आणि कोकण रेल्वेचे माजी कर्मचारी अभय धुरी यांच्या घरावर वर्षावनातील (रेनफॉरेस्ट) एक विशाल वृक्ष उन्मळून पडल्याने त्यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
काणकोण अग्निशमन दलाचे एस. के. देसाई यांच्या माहितीनुसार, हे झाड आधी वीज वाहिनीवर आणि त्यानंतर घराच्या छतावर कोसळले. घटना घडली तेव्हा घरातील सदस्य आतच होते, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.