धारगळ पेडणे प्रवेश शुल्क बूथची मोडतोड प्रकरण

म्हापसा : धारगळ पेडणे येथील प्रवेश शुल्क बूथची तोडफोड तसेच कर्मचार्यांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री नीतेश राणे यांच्या विरोधात म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट जारी केला आहे.
या खटल्याची सुनावणी म्हापसा न्यायालयात सुरू असून एकूण ९ संशयितांमध्ये नीतेश राणे हे या प्रकरणात संशयित आरोपी आहेत. शनिवार, ४ रोजी सुनावणीवेळी न्यायालयात मंत्री नीतेश राणे हे हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. तर, इतर संशयित असलेले राहुल परब, मुकुंद परब, हरिश्चंद्र परब, राकेश परब, प्रशांत मळकर, विनम्र आचरेकर, सागर पाटील व संतोष राऊत हे सुनावणीवेळी हजर होते.
न्यायालयाने या खटल्याची पुढील सुनावणी येत्या सोमवारी ६ रोजी निश्चित केली असून त्या दिवशी राणे हे न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ३ डिसेंबर २०१३ रोजी प्रवेश शुल्क बूथ तोडफोड तसेच कर्मचार्यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. तत्कालिन राज्य सरकारने राज्याच्या सीमेवर परराज्यातून गोव्यात प्रवेश करणार्या चारचाकीपेक्षा वरच्या वाहनांना प्रवेश शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार धारगळ पेडणे येथे सरकारने प्रवेश शुल्क बूथ उभारला होता व त्याद्वारे हे प्रती वाहन २५० रुपये शुल्क वसूल केले जात होते.
घटनेच्या दिवशी संशयित आरोपी नीतेश राणे हे आपल्या कळंगुट येथील हॉटेलवर जाण्यासाठी सावंतवाडीहून गोव्याकडे येत होते. त्यांच्यासमवेत त्यांचे समर्थक होते. एकूण तीन चारचाकी गाड्या त्यांच्या होत्या.
धारगळ येथील प्रवेश शुल्क बूथवर येताच तेथील कर्मचार्यांनी त्यांच्याकडे शुल्काची रक्कम मागितली तेव्हा संशयितांनी सदर कर्मचार्यांना मारहाण केली तसेच बूथची मोडतोड केली. ही मोडतोड केल्यावर सर्वजण कळंगुट येथे गेले असता त्यांना पेडणे पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.