महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना आज

लंडन: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर ५ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पर्धेत दोन्ही संघांनी एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे.
महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने यंदा बक्षिसाच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या विजेत्या संघाला चमचमत्या ट्रॉफीसोबत २.३४ मिलियन डॉलर म्हणजेच २२ कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला १.१७ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ११ कोटी रुपयांवर समाधान मानावे लागेल. या वाढीव बक्षिसांमुळे दोन्ही संघांना कोट्यवधींची कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे.
सहा वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने पहिल्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करत पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. आपल्या चिवट आणि आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा ऑस्ट्रेलियन संघ सातव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे.
दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला मात देत इंग्लंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंडने आतापर्यंत एकदाच हा विश्वचषक जिंकला आहे. यंदा त्यांना घरच्या मैदानाचा (होम ग्राऊंड) फायदा मिळण्याची शक्यता आहे.
हा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल, तर नाणेफेक (टॉस) अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी ७.३० वाजता होईल.
इंग्लंड संघ: नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), डॅनिएल गिब्सन, एमी जोन्स, लॉरेन बेल, ॲलिस कॅप्सी, टिली कोर्टने-कोलमन, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टन, लॉरेन फायलर, फ्रेया केम्प, हेदर नाइट, लिन्से स्मिथ, इसी वाँग, डॅनी वायट-हॉज.
ऑस्ट्रेलिया संघ: सोफी मोलिनक्स (कर्णधार), टाहलिया मॅकग्रा, ॲशले गार्डनर, जॉर्जिया वेअरहॅम, जॉर्जिया वोल, ॲनाबेल सदरलँड, मेगन शट, एलिस पेरी, बेथ मूनी, फोबी लिचफिल्ड, अलाना किंग, ग्रेस हॅरिस, लुसी हॅमिल्टन, किम गार्थ, निकोला केरी.