Home >> गोवा >> फर्मागुडीच्या श्री गोपाळ गणपती मंदिराचा होणार कायापालट

फर्मागुडीच्या श्री गोपाळ गणपती मंदिराचा होणार कायापालट

मंदिराच्या सुशोभीकरणासाठी १२.५१ कोटींचा प्रकल्प : ‘जीटीडीसी’कडून निविदा जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 11:38 pm
फर्मागुडीच्या श्री गोपाळ गणपती मंदिराचा होणार कायापालट

पणजी : राज्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी फर्मागुडी-फोंडा येथील प्रसिद्ध श्री गोपाळ गणपती मंदिराच्या सुशोभीकरण व पुनर्विकासासाठी १२.५१ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) निविदा प्रक्रिया सुरू केली असून, मंदिर परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यात येणार आहे.
जीटीडीसीने जारी केलेल्या निविदेनुसार, आर्किटेक्चरल आणि कन्सल्टिंग फर्म मेसर्स अभिजीत साधले यांच्याकडे प्रकल्पाचे नियोजन, आराखडा, डिझाइन आणि कामाचे पर्यवेक्षण सोपविण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यमान मंदिराचे पुनर्विकास, सुशोभीकरण आणि आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. तसेच भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. मंदिराभोवती नवीन परिक्रमा मार्ग उभारण्यात येणार असून, त्यामध्ये सांस्कृतिक कलाकृती, कोरीव शिल्पे आणि सजावटीच्या मूर्तींची मांडणी केली जाणार आहे. या कॉरिडॉरमध्ये कोरीव ग्रॅनाइटचे मजबूत खांब आणि दगडी छत उभारले जाणार आहे.
याशिवाय फेरो-सिमेंटच्या गुमट्या, सजावटीच्या कमानी, नक्षीदार खिडक्या आणि मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ग्रॅनाइटचे कलात्मक खांब बसवून त्याला भव्य स्वरूप दिले जाणार आहे. रात्री मंदिर परिसर अधिक आकर्षक दिसावा यासाठी संपूर्ण आवारात आधुनिक आर्किटेक्चरल लायटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी कंत्राटदाराला ३६० दिवसांचा कालावधी देण्यात आला असून, पावसाळ्याचा कालावधी लक्षात घेऊन कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
धार्मिक पर्यटनाला मिळणार चालना
फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती मंदिर हे गोव्यातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मंदिर आहे. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांनी १९६६ मध्ये या मंदिराची स्थापना केली होती. १२.५१ कोटी रुपयांच्या या विकास प्रकल्पामुळे मंदिराचे सौंदर्य खुलणार असून धार्मिक पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.      

हेही वाचा
सर्व पहा