Home >> गोवा >> गोव्यात समविचारी पक्षांच्या युतीसाठी आपची तत्वतः परवानगी : अरविंद केजरीवाल

गोव्यात समविचारी पक्षांच्या युतीसाठी आपची तत्वतः परवानगी : अरविंद केजरीवाल

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
32 mins ago
गोव्यात समविचारी पक्षांच्या युतीसाठी आपची तत्वतः परवानगी : अरविंद केजरीवाल

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) हरवायचे असेल तर समविचारी पक्षांची युती होणे आवश्यक आहे. युतीबाबत गोव्यातील पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीने तत्वतः परवानगी दिली आहे. याबाबत पुढील काही दिवसांत विविध पक्षांसोबत बोलणी होईल. त्यानंतर केंद्रीय समिती अंतिम निर्णय घेईल असे आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party)  राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

 शनिवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी अतिशी, प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, आमदार वेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 

केजरीवाल म्हणाले की, काही दिवसांपूर्वी गोव्यातील आपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय समितीला गोव्यात युती होणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. या प्रस्तावाला केंद्रीय समितीने तत्वतः मंजुरी दिली आहे. समितीच्या निर्देशानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीची चर्चा सुरू केली आहे. येथील पक्षांनी दिलेले प्रस्ताव केंद्रीय समितीला कळवण्यात येतील. यानंतरच युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. आमचा पक्ष राज्यातील सर्व चाळीस मतदारसंघात मजबूत आहे. 

युती करण्याचा निर्णय झाल्यानंतर कुणाला किती जागा द्याव्यात यावर विचार होईल. जागा वाटपाबाबत आताच काही बोलता येणार नाही. 

आमदार वेंझी व्हिएगस म्हणाले की, भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राज्यात एका नवीन राजकीय पक्षाची चर्चा सुरू आहे. भाजप विरोधातील मते फोडायची नसतील तर या नवीन पक्षाने देखील आमच्यासोबत येणे आवश्यक आहे. युतीबाबत आम्ही पुढाकार घेतला आहे. आता काँग्रेससह अन्य पक्षांनी पुढे येऊन चर्चा केली पाहिजे. 

सर्व विरोधी पक्षांना भाजपच्या त्रासातून जनतेला सोडवायचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आता एकमेकांच्या विरोधात बोलण्याऐवजी भाजपच्या विरोधात बोलणे योग्य आहे.

आरोग्य विमा सुरक्षा १० लाख रुपये करा 

केजरीवाल म्हणाले की, गोव्यातील डीडीएसएसवाय योजनेतील विमा सुरक्षा रक्कम अंत्यत कमी आहे. ही योजना अपयशी ठरली आहे. येथील भाजप सरकारने पंजाब सरकार प्रमाणे १० लाख रुपये विमा सुरक्षा देणारी योजना सुरू करावी. आपच्या निवडणूक जाहीरनाम्यात आम्ही याविषयी आश्वासन देणार आहोत.


हेही वाचा
सर्व पहा