Home >> गोवा >> गोव्यातील २० अधिकाऱ्यांना दिल्लीत मिळणार विशेष प्रशिक्षण!

गोव्यातील २० अधिकाऱ्यांना दिल्लीत मिळणार विशेष प्रशिक्षण!

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ ते १० जुलै दरम्यान होणार प्रशिक्षण

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
27 mins ago
गोव्यातील २० अधिकाऱ्यांना दिल्लीत मिळणार विशेष प्रशिक्षण!

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्यानंतर, आता त्यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी गोव्यातील २० अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, त्यांना नवी दिल्ली येथे ६ जुलै ते १० जुलै या कालावधीत विशेष निवडणूक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे प्रशिक्षण निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट मार्फत दिले जाईल.
या संस्थेमार्फत निवडणुकीपूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षणाचे नियोजन सुटसुटीत व्हावे यासाठी अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ६ जुलैपासून दिल्लीत हे प्रशिक्षण सुरू होत आहे.
वसंत दाभोलकर (आयएएस) यांच्यासह एकूण २० अनुभवी अधिकाऱ्यांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिवप्रसाद नाईक, साबा परब, ईश्वर मडकईकर, शमा आरोंदेकर, सोनिया कुंकळ्येकर, पंकज मराठे, अनंत मळीक, जयेश मयेकर, प्रतीक पोरोब, भीमनाथ खोर्जुवेकर, कौशिक आमोणकर, अवेलिना डिसा परेरा, प्रतापराव गावकर, दशरथ गावस, गणेश बर्वे, अॅना रिता मारिया पायश, अमितेश शिरवईकर, विमोद दलाल, भगवंत करमली यांचा समावेश आहे.
यंदाच निवडणूक होण्याची शक्यता
गोवा विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी संपत असला, तरी राजकीय समीकरणांमुळे या वर्षीच निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आधीच प्रचाराच्या आणि तयारीच्या कामाला लागले असताना, आता निवडणूक आयोगानेही आपली प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे.

हेही वाचा
सर्व पहा