
पणजी : डिचोली तालुक्यातील २० वर्षीय युवतीशी मैत्री करून २०२२ मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पीडित युवतीने न्यायालयात उलटतपासणीत जबाब फिरविल्यामुळे २२ वर्षीय संशयित युवकाची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा आदेश न्या. डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.
या प्रकरणी डिचोली पोलिसांनी १७ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, या संदर्भात २० वर्षीय युवतीने तक्रार दाखल केली होती. नोव्हेंबर २०२२ मध्ये २२ वर्षीय युवकाने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर सदर युवकाने तिच्यावर अनेकदा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले. या प्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित युवकाला अटक केली. त्यानंतर पीडित युवती आणि संशयिताची वैद्यकीय चाचणी करण्यात आले. त्यात युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते. न्यायालयाने ५ ऑक्टोबर २०२४ रोजी संशयिताला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी तपासपूर्ण करून ८ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन संशयिताच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याच दरम्यान न्यायालयात पीडित युवतीची उलटतपासणी करण्यात आली असता, आपल्याला तक्रारी संदर्भात काहीच बोलायचे नाही. तसेच संशयिताविरोधात युवतीने कोणतीच साक्ष दिली नाही. याची दखल घेऊन न्यायालयाने युवकाची पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.