Home >> गुन्हे >> कर्ज फिटले तरी सोने परत मिळेना; दोन एफआयआर होऊनही पोलीस ढिम्म

कर्ज फिटले तरी सोने परत मिळेना; दोन एफआयआर होऊनही पोलीस ढिम्म

शेवटी वास्कोतील महिलांनी स्वतः सोनाराला आणले पोलीस स्थानकात

Story: गोवन वार्ता | वेब डेस्क |
26 mins ago
कर्ज फिटले तरी सोने परत मिळेना; दोन एफआयआर होऊनही पोलीस ढिम्म

पणजी : गोव्यातील वास्को परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरिबांना लुटणाऱ्या एका भामट्या सराफाचा पर्दाफाश झाला आहे. वास्को जवळील 'सडा' भागातील काही संतप्त महिलांनी कायदा हातात घेत, उजळमाथ्याने  फिरणाऱ्या सराफाला स्वतः पकडले आणि त्याला थेट वास्को पोलीस ठाण्यात ओढत आणले. भीमप्पा चलवादी असे या संशयिताचे सराफाचे नाव असून, त्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या कथित निष्क्रियतेला कंटाळलेल्या महिलांनी स्वतः हा हायव्होल्टेज ड्रामा घडवून आणल्याने संपूर्ण गोव्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

माहितीनुसार संशयित सराफ भीमप्पा चलवादी याने आपण स्वतःची स्वतंत्र बँकिंग प्रणाली सुरू केल्याचा दावा केला होता. बँकेप्रमाणेच पण अत्यंत कमी म्हणजे अवघ्या ०.६५ टक्के व्याजदराने सोने तारण कर्ज देण्याचे आमिष त्याने स्थानिक महिलांना दाखवले. सर्वसामान्य महिलांनी बँकेपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळते म्हणून आपले सोने या सराफाकडे गहाण ठेवले. अनेक महिलांनी नियमित हप्ते भरून आपल्या कर्जाची पूर्ण परतफेड देखील केली. मात्र, जेव्हा महिला आपले सोने परत घेण्यासाठी गेल्या, तेव्हा सराफाने मूळ रूप दाखवण्यास सुरुवात केली. कर्ज नील झाल्यानंतरही त्याने महिलांचे सोन्याचे दागिने परत देण्यास स्पष्ट नकार दिला.

या फसवणुकीविरोधात पीडित महिलांनी मुरगाव पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र एफआयआर (गुन्हे) नोंदवले होते. मात्र, गुन्हे नोंदवूनही पोलिसांनी आरोपीवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट आरोपी फरार असल्याचे सांगून पोलिसांनी हात वर केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पोलीस आपल्याला पकडू शकत नाहीत, कारण "पोलीस माझ्या खिशात आहेत", अशी उघड वल्गना हा सराफ महिलांसमोर करत होता. पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा मावळल्याने आणि आरोपी उजळ माथ्याने फिरत असल्याचे पाहून सडा येथील महिलांचा संयम सुटला. त्यांनी स्वतःच या प्रकरणाचा छडा लावण्याचे ठरवले.

बुधवारी महिलांनी सापळा रचून या फरार सराफाला सडा परिसरात गाठले. त्याला पकडून थेट वास्को पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांनी प्रचंड गोंधळ घालत आपला संताप व्यक्त केला. महिलांनी आरोप केला आहे की, लोकांच्या कष्टाच्या पैशांवर आणि सोन्यावर या सराफाने नुकतेच दोन नवीन आलिशान बंगले आणि इतर मालमत्ता खरेदी केली आहे, तर दुसरीकडे मूळ मालक आपल्या दागिन्यांसाठी दाहीदिशा फिरत आहेत.

हे प्रकरण केवळ एका फसवणुकीपुरते मर्यादित नसून, कमी व्याजाच्या आमिषाला बळी पडणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक मोठा धडा आहे. अनधिकृत वित्तीय संस्था किंवा व्यक्तींकडे सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू गहाण ठेवताना काय काळजी घ्यावी, यावर आता समाजमाध्यमांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पीडित महिलांनी आता त्यांच्या हक्काचे सोने तातडीने जप्त करण्याची आणि या गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी आता वास्को आणि मुरगाव पोलीस पुढील कायदेशीर पावले कशी उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा