Home >> गोवा >> गिरीश चोडणकरांकडून काँग्रेस मजबूत करण्याऐवजी पक्ष संपवण्याचे काम

गिरीश चोडणकरांकडून काँग्रेस मजबूत करण्याऐवजी पक्ष संपवण्याचे काम

भाजपचे प्रवक्ते सिद्धेश नाईक यांची टीका

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
2 hours ago
गिरीश चोडणकरांकडून काँग्रेस मजबूत करण्याऐवजी पक्ष संपवण्याचे काम

पणजी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पक्ष मजबूत करण्याऐवजी काँग्रेस संपवण्याचे काम सुरू केले आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते सिद्धेश नाईक यांनी केली. तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ३० हून अधिक मतदारसंघ जिंकून पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजप सासष्टी तालुक्यात धर्मनिरपेक्ष पक्षांना मदत करून काँग्रेसची मते फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सिद्धेश नाईक बोलत होते. यावेळी रविंद्र भवन, बायणा वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गिरीश चोडणकर यांनी भाजपने एका धर्मनिरपेक्ष पक्षाला सासष्टीत १०० कोटी रुपये दिल्याचा बिनबुडाचा आरोप केला आहे.

ते पुढे म्हणाले की, २०१८ ते २०२२ या काळात चोडणकर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना अनेक आमदारांनी पक्ष सोडला. आता पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून कार्यकर्ते पक्षापासून दूर जात आहेत. पक्षाध्यक्षाचे काम पक्ष बळकट करणे असते; मात्र चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उलट पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत.

२०१८ ते २०२२ या कालावधीत किती आमदारांनी काँग्रेसमध्ये फूट पाडली आणि त्यामागील कारणे काय होती, याचे उत्तर चोडणकर यांनी द्यावे, अशी मागणीही नाईक यांनी केली. ते अध्यक्ष होताच काँग्रेस अधिक कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

देशभरातील विरोधी पक्ष आघाडी करण्याचा प्रयत्न करत असले तरी काँग्रेससोबत यायला कोणताही पक्ष तयार नसल्याचेही नाईक म्हणाले. गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसचा राज्यातील प्रभाव कमी होत असून भविष्यात तो केवळ प्रादेशिक पक्षापुरता मर्यादित राहील, असा दावा त्यांनी केला.

भाजप हा देशातील १४ कोटी आणि गोव्यातील ४ लाख कार्यकर्त्यांचा पक्ष असून अशा प्रकारचे आरोप म्हणजे या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे नाईक यांनी सांगितले. भाजपला कोणालाही १०० कोटी रुपये देण्याची गरज नसून प्रत्येक मतदारसंघात पक्षाचे सक्षम कार्यकर्ते आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा