मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास योजनेला मंजुरी

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : मुलींना आता आयटीआय अभ्यासक्रमांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. आयटीआयमधील विद्यार्थिनींसाठी अभ्यासक्रम शुल्क माफ करणाऱ्या ‘मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास योजने’ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना शिक्षण शुल्कातून पूर्ण सूट मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
पर्वरी येथील मंत्रालयात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री बोलत होते. आयटीआयमधील विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांमध्ये अधिकाधिक मुलींनी प्रवेश घ्यावा, या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. राज्यात पणजी, म्हापसा, डिचोली, सत्तरी, पेडणे, फर्मागुडी, वास्को, मडगाव, काकोडा आणि काणकोण येथे आयटीआय संस्था आहेत. या सर्व आयटीआयमध्ये मिळून ४४ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
सध्या आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून सर्व संस्थांमध्ये मिळून हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध आहेत. संगणक, हॉस्पिटॅलिटी, इलेक्ट्रिशियन आणि फिटर या अभ्यासक्रमांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय इतरही विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. आयटीआयमधील अभ्यासक्रम इयत्ता ८ वी, १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांबरोबरच पदविकाधारक आणि पदवीधरांसाठीही खुले आहेत. नव्या योजनेमुळे मुलींना हे सर्व अभ्यासक्रम विनाशुल्क उपलब्ध होणार असून कौशल्याधारित शिक्षणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.