आरक्षणाबाबत मंत्री सुभाष फळदेसाई यांची स्पष्ट भूमिका

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : सांगे विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव झाला, तरी भाजपचा जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मी काम करेन. भाजप उमेदवाराचा प्रचारप्रमुख होण्याचीही माझी तयारी आहे, असे समाजकल्याण मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी आरक्षण लागू होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
गोवा अनुसूचित जमाती आरक्षण विधेयक संसदेत मंजूर होऊन त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. मात्र, त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अधिसूचना अद्याप जारी झालेली नाही. ही अधिसूचना तातडीने काढावी, अशी राज्यातील एसटी नेत्यांची मागणी आहे. २०११ च्या जनगणनेच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एसटी आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली. सॉलिसिटर जनरल यांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिले आहे.
जनगणना दर दहा वर्षांनी होते. २०११ नंतर २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते; मात्र कोविडमुळे ती होऊ शकली नाही. जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा पुढील वर्षी होणार आहे. मात्र, त्याआधी विधानसभेचा कार्यकाळ संपणार असल्याने २०११ च्या जनगणनेच्या आधारे एसटी आरक्षण लागू करणे शक्य आहे का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार आरक्षण लागू झाल्यास प्रियोळ, काणकोण, नुवे, केपे आणि सांगे यापैकी चार मतदारसंघ एसटींसाठी राखीव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुभाष फळदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
एसटी आरक्षणासाठीचा कायदा मंजूर झाला आहे. राज्यघटनेनुसार एसटी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. याविषयी मला कोणी विश्वासात घेतले नसले तरी सांगे मतदारसंघ राखीव झाला, तरी माझी कोणतीही हरकत नाही. आतापर्यंत मी पक्षासाठी काम केले आहे आणि पुढेही पक्षासाठीच काम करत राहीन.
_ सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री