Home >> गुन्हे >> पिळगावातील तारण ठेवलेल्या जमिनीच्या सौद्यातून ३० लाख उकळले

पिळगावातील तारण ठेवलेल्या जमिनीच्या सौद्यातून ३० लाख उकळले

फोंड्यातील दाम्पत्याविरुद्ध साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पिळगावातील तारण ठेवलेल्या जमिनीच्या सौद्यातून ३० लाख उकळले

म्हापसा : पिळगाव, डिचोली येथील जमीन कोणत्याही कायदेशीर वादात नसून ती पूर्णपणे कर्जमुक्त आहे, असे खोटे सांगून, सांगोल्डा येथील एका व्यक्तीकडून टोकन स्वरूपात ३० लाख रुपये रक्कम उकळून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी साळगाव पोलिसांनी फोंडा येथील गीतेश जी. नाईक आणि त्यांची पत्नी रोमा नाईक या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी सांगोल्डा येथील रहिवासी नितीन लीला यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयित आरोपी गीतेश नाईक आणि त्यांची पत्नी रोमा यांनी संगनमताने हा फसवणुकीचा डाव रचला. संशयितांनी पिळगाव-डिचोली येथील एका सर्व्हे क्रमांक ३८/४, ३८/८ व ३८/१० या जमिनीबाबत फिर्यादी नितीन लीला यांच्याशी व्यवहार केला. ही जमीन कोणत्याही कायदेशीर कचाट्यात अडकलेली नाही, असे खोटे आश्वासन देऊन संशयितांनी तक्रारदाराला ती खरेदी करण्यास प्रवृत्त केले.
वास्तविक पाहता, ही जमीन आधीच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडकडे तारण (मॉर्टगेज) ठेवण्यात आली होती. यासंबंधीची न्यायालयात कायदेशीर प्रक्रियाही सुरू होती. या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना असूनही संशयित नाईक दाम्पत्याने फिर्यादी लीला यांच्याकडून जमिनीच्या व्यवहारापोटी ३० लाख रुपयांची टोकन रक्कम आगाऊ स्वरूपात घेतली.
दरम्यान, तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२) व ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी हे करत आहेत.
खरेदीपत्र देण्यास टाळाटाळ
पैसे घेतल्यानंतर संशयितांनी ठरल्याप्रमाणे खरेदीपत्र (सेल डीड) नोंदवून देण्यास टाळाटाळ सुरू केली. तसेच घेतलेली ३० लाख रुपयांची रक्कमही परत करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्टपणे लक्षात येताच नितीन लीला यांनी साळगाव पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार नोंदवली.            

हेही वाचा
सर्व पहा