मे २०२६ची अंतिम मुदतही संपली; रामनगर–गोवा मार्ग पुन्हा बंद होण्याचा धोका!

जोयडा : बेळगाव–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानापूर ते अनमोडदरम्यान सुरू असलेल्या सुमारे ५४ किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाची मे २०२६ ही अंतिम मुदत संपूनही प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्याप अर्धवटच आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपूल, पूल, संरक्षक भिंती आणि रस्त्याची कामे अपूर्ण असून पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये मालवाहू ट्रकसह इतर वाहने अडकण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास यंदाच्या पावसाळ्यात रामनगर–गोवा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
गोवा आणि कर्नाटकला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग व्यापारी, औद्योगिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज हजारो मालवाहू ट्रक, प्रवासी बसगाड्या, खासगी वाहने आणि पर्यटक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेले दुहेरीकरणाचे काम आजही पूर्णत्वास पोहोचलेले नाही. परिणामी, प्रत्येक पावसाळ्यात वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात डीबीएल (DBL) कंपनीने अवघ्या दोन वर्षांत सुमारे निम्म्या मार्गाचे काम पूर्ण केले होते. त्यामुळे उर्वरित कामही लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर कंत्राटदार बदलणे, कामाचा वेग मंदावणे, प्रशासकीय अडचणी आणि विविध कारणांमुळे प्रकल्प रखडत गेला. परिणामी, आठ वर्षांनंतरही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही.
या दुहेरीकरणाचे काम मार्च २०२४ मध्ये सुरू होऊन मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने मुदतीत काम पूर्ण न केल्याने केंद्र सरकारने त्याच्यावर सुमारे दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत उर्वरित काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मात्र, मे महिना संपून जुलै सुरू झाला तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही विशेष बदल झालेला नाही.
रामनगर ते अनमोडदरम्यान अनेक ठिकाणी उड्डाणपूल, लहान-मोठे पूल आणि संरक्षक भिंतींची कामे अद्याप अपूर्ण आहेत. या ठिकाणी तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर खोल खड्डे पडले असून ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. पाण्यामुळे रस्त्याचा तळही कमकुवत झाला असून जड वाहने थेट खड्ड्यात अडकत आहेत.
याच निष्काळजीपणाचे आणखी एक उदाहरण गुरुवारी सकाळी रामनगरजवळ पाहायला मिळाले. गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने येणारा मालवाहू ट्रक अर्धवट काम सुरू असलेल्या ठिकाणी खोल खड्ड्यात अडकला. ट्रकचा तळभाग थेट जमिनीला टेकल्याने वाहन रस्त्याच्या मध्यभागीच बंद पडले. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना या महामार्गावरील धोकादायक परिस्थितीचे जिवंत उदाहरण ठरली आहे.
इशारा फलक, रात्रीची प्रकाश व्यवस्था अपुरी
स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या म्हणण्यानुसार, काम सुरू असलेल्या ठिकाणी आवश्यक ते इशारा फलक, सुरक्षितता उपाययोजना आणि रात्रीची प्रकाशव्यवस्था अत्यंत अपुरी आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक ठिकाणी खड्डे बुजविणे किंवा तात्पुरती दुरुस्ती करण्याची तसदीही संबंधित यंत्रणांनी घेतलेली नाही. त्यामुळे रोजच वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अंतिम मुदत संपली तरी काम अधुरे
या महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) या गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे. अंतिम मुदत संपली, दंडाची कारवाई झाली, तरीही काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ते, धोकादायक खड्डे आणि वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. "बेळगाव–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे ना कोणाला सुईर, ना सुतिक" अशीच भावना आता वाहनचालक उघडपणे व्यक्त करत आहेत.
रामनगर–गोवा मार्ग पुन्हा बंद होण्याचा धोका
गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या दुहेरीकरणाच्या कामामुळे खानापूर–अनमोड परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात याच मार्गावर वाहतूक विस्कळीत होणे, वाहने अडकणे, अपघात होणे आणि नेहमीच वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येते.
सध्याची परिस्थिती पाहता यंदाच्या पावसाळ्यात रामनगर–गोवा मार्ग पुन्हा बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करून धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहील, अशी तीव्र प्रतिक्रिया वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.