Home >> गोवा >> ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खून करणारी संशयित महिला अखेर अटकेत

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खून करणारी संशयित महिला अखेर अटकेत

कळंगुट पोलिसांची मंगळुरूमध्ये मोठी कारवाई

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून खून करणारी संशयित महिला अखेर अटकेत

म्हापसा: कॅसिनोत ओळख वाढवून श्रीमंतांना ‘हनी ट्रॅप’मध्ये ओढून लुबाडणाऱ्या आणि उडुपी (कर्नाटक) येथील वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२) यांच्या मृत्यू प्रकरणी फरार असलेल्या संशयित महिलेला कळंगुट पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अक्षता ऊर्फ रूपाश्री सी. असे या संशयित महिलेचे नाव असून, कर्नाटक पोलिसांच्या मदतीने तिला मंगळुरू येथून जेरबंद करण्यात आले आहे.

संशयित महिला गोव्यातून मंगळुरूकडे पसार झाल्याची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांचे पथक बुधवारी (१ जुलै) कर्नाटकात रवाना झाले होते. सलग तीन दिवस या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसून शोध घेत आज (शुक्रवारी) तिला पकडले. या संशयित महिलेचा ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला असून, पोलीस पथक तिला घेऊन शनिवारी सकाळी गोव्यात दाखल होणार आहे. त्यानंतर संदीप यांना कोणते गुंगीचे औषध पाजले होते आणि या मृत्यूचा नेमका घटनाक्रम काय, याचा उलगडा होणार आहे.

श्रीमंतांना हेरून ‘हनी ट्रॅप’चा विळखा

कॅसिनोमध्ये आलेल्या श्रीमंत व्यक्तींना आपल्या मोहात पाडून त्यांना लुबाडण्याचा या महिलेचा गोरखधंदा होता. तिच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या अनेक पर्यटकांना ब्लॅकमेलिंगचा सामना करावा लागला होता. याच जाळ्यात अडकलेल्या संदीप सुवर्णा यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. यापूर्वी एप्रिल महिन्यात गुजरातमधील पर्यटक तोमेश यादव यांनाही तिने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले होते. त्यांच्याकडून २.४० लाख रुपये रोख आणि १५.४ लाखांचे दागिने तिने लांबवले होते. यादव यांनीच पुढे येऊन या महिलेविरुद्ध पोलिसांत पहिली तक्रार दाखल केली होती.

गुंगीचे औषध पाजून पळवली सोनसाखळी

-) ३० जून रोजी कळंगुटमधील एका रिसॉर्टच्या खोलीत संदीप सुवर्णा यांचा मृतदेह आढळला होता. घटनेच्या दिवशी ही संशयित महिला त्यांच्यासोबत त्याच खोलीत होती.

-) तिने संदीप यांना गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले आणि त्यांची सोनसाखळी तसेच पाकीट पळवल्याचा संशय आहे.

-) या खून प्रकरणी संदीप यांचा भाऊ चेतन सुवर्णा यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम १२३, ३०९ व १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरण एका नजरेत

संशयित : अक्षता ऊर्फ रूपाश्री सी.

अटक : मंगळुरू

अटक करणारे : कळंगुट पोलीस + कर्नाटक पोलीस

घटना : कळंगुट रिसॉर्ट

मृत : संदीप सुवर्णा (४२)

संशय : गुंगीचे औषध

चोरी : सोनसाखळी व पाकीट

गुन्हे : बीएनएस कलम १२३, ३०९, १०३(१)


‘हनी ट्रॅप’ ते अटक : घटनाक्रम

एप्रिल २०२६

गुजरातचे पर्यटक तोमेश यादव ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकले.

२.४० लाख रोख आणि १५.४० लाखांचे दागिने लंपास.

३० जून २०२६

कळंगुटमधील रिसॉर्टमध्ये संदीप सुवर्णा (४२) यांचा मृतदेह आढळला.

संशयित महिला त्यांच्यासोबत त्याच खोलीत होती.

१ जुलै २०२६

संशयित गोव्यातून पसार झाल्याची माहिती मिळताच कळंगुट पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना.

३ जुलै २०२६

मंगळुरू येथे कर्नाटक पोलिसांच्या मदतीने संशयित अक्षता ऊर्फ रूपाश्री सी. हिला अटक.

४ जुलै २०२६

ट्रान्झिट रिमांडवर संशयित महिलेला गोव्यात आणणार; चौकशीत गुंगीचे औषध आणि मृत्यूचा नेमका घटनाक्रम उलगडण्याची शक्यता.


हेही वाचा
सर्व पहा