Home >> गोवा >> विदेशातून सोने, रोख रक्कम पाठवल्याचे आमिष; आगशीतील महिलेची १.६७ लाखांची फसवणूक

विदेशातून सोने, रोख रक्कम पाठवल्याचे आमिष; आगशीतील महिलेची १.६७ लाखांची फसवणूक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
25 mins ago
विदेशातून सोने, रोख रक्कम पाठवल्याचे आमिष; आगशीतील महिलेची १.६७ लाखांची फसवणूक

पणजी : विदेशातून सोने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असलेले पार्सल पाठवल्याचे आमिष दाखवून आगशी येथील एका महिलेची तब्बल १ लाख ६७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आगशी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगशी येथील डेक्सीभाट परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. ९ जून ते ११ जून २०२६ या कालावधीत एका अज्ञात व्यक्तीने एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून त्यांच्याशी संपर्क साधत मैत्री निर्माण केली आणि सातत्याने संवाद सुरू ठेवला.

यानंतर संबंधित व्यक्तीने विदेशातून त्यांच्या नावाने सोने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असलेले पार्सल पाठविल्याचा दावा केला. त्यानंतर आणखी एका संशयिताने स्वतःला मुंबई विमानतळावरील भारतीय दूतावासाचा अधिकारी असल्याचे भासवत दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला.

संबंधित पार्सलमध्ये बेकायदेशीर सोने व रोख रक्कम आढळल्याने ते जप्त करण्यात आल्याचे सांगून ते सोडविण्यासाठी विविध शुल्क भरण्याची मागणी करण्यात आली. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने विविध व्यवहारांद्वारे एकूण १ लाख ६७ हजार रुपये आरोपींनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी रायबंदर येथील सायबर क्राइम विभागाकडे (Cyber Crime Police Station Ribandar) तक्रार दाखल केली.  त्यानंतर झिरो एफआयआरच्या आधारे आगशी पोलीस ठाण्यात (Agacaim, Tiswadi, North Goa)  गुन्हा नोंद करण्यात आला.  पोलीस उपनिरीक्षक शुभम कोरगावकर पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा