Home >> गोवा >> ‘नक्शा’ प्रकल्पाअंतर्गत पणजीतील जमिनींच्या मालकी हक्कांची चौकशी सुरू

‘नक्शा’ प्रकल्पाअंतर्गत पणजीतील जमिनींच्या मालकी हक्कांची चौकशी सुरू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
43 mins ago
‘नक्शा’ प्रकल्पाअंतर्गत पणजीतील जमिनींच्या मालकी हक्कांची चौकशी सुरू

पणजी : वसाहत आणि भूमी नोंदणी संचालनालयाच्या ‘नक्शा’ प्रकल्पाअंतर्गत पणजी महानगरपालिका क्षेत्र तसेच लगतच्या शहरी-ग्रामीण मिश्र भागातील जमिनींच्या मालकी हक्क आणि हितसंबंधांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्षेत्रातील जमिनींवर हक्क किंवा हितसंबंध असलेल्या सर्व धारकांनी व मालकांनी संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे सादर करून चौकशी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संचालनालयाने केले आहे.

‘नक्शा’ पायलट प्रकल्पाअंतर्गत पणजी शहर परिसरातील जमिनींची प्रत्यक्ष पाहणी आणि तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढील टप्प्यात मालकी हक्क निश्चित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. गोवा भूमी महसूल संहिता, १९६८ मधील कलम १४ आणि कलम ८५ अन्वये नियुक्त चौकशी अधिकारी संबंधित जमिनीवरील व्यक्ती आणि संस्थांचे हक्क, मालकी हक्क तसेच हितसंबंधांची पडताळणी करणार आहेत.

या प्रक्रियेदरम्यान नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना, हरकती आणि आक्षेपांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.  संबंधित मालमत्तेबाबत न्यायालयीन याचिका किंवा दिवाणी खटले प्रलंबित असल्यास न्यायालयाच्या अंतरिम आदेशांनुसार अथवा अंतिम निकालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

चौकशी अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर संबंधित जमिनींसाठी मसुदा ‘अर्बन प्रॉपर्टी कार्ड’ तयार करण्यात येणार आहे. ही संपूर्ण चौकशी प्रक्रिया सर्व्हे आणि जमीन नोंदणी निरीक्षक कार्यालय, पणजी येथे पार पडणार आहे.  संबंधित जमीनधारकांनी या मह‌िन्याच्या ६ ते २७ जुलै या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा
सर्व पहा