Home >> गोवा >> वेणुगोपाल यांच्यासमोर असंतुष्ट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आपल्या व्यथा

वेणुगोपाल यांच्यासमोर असंतुष्ट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आपल्या व्यथा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
24 mins ago
वेणुगोपाल यांच्यासमोर असंतुष्ट काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आपल्या व्यथा

पणजी: काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष आणि 'गोवा काँग्रेस' या नावाने जन्माला आलेल्या नवीन पक्षाच्या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वेणुगोपाल यांच्यासोबत झालेली काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बरीच तापली. या वेळी पदाधिकाऱ्यांनी आपल्या असंतोषाला  वाट करून दिली.




काल रात्री के. सी. वेणुगोपाल गोव्यात दाखल झाले आणि आज सकाळी त्यांनी दोनापावला येथील 'ताज सिदाद दे गोवा' या तारांकित हॉटेलमध्ये गोवा प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक बोलावली. सर्वात आधी वेणुगोपाल यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत ‘वन टू वन’ बैठक घेऊन त्यांच्याकडून उत्तरे मागवून घेतली. या बैठकीदरम्यान पक्षातील असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यथा आणि तक्रारी वेणुगोपाल यांच्यासमोर मांडल्या. गिरीश चोडणकर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जे कार्यकर्ते दुखावले गेले, त्याविषयीच्या तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीत वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हजर होते.




बैठकीनंतर बोलताना गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, गेली साडेचार वर्षे गोव्यात काँग्रेससाठी काम करून आम्ही आमचा कॅडर (कार्यकर्त्यांची फळी) उभारला आहे, तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांना महत्त्व देऊन आम्ही त्यांना कसे प्रोत्साहित केले, हे आम्ही के. सी वेणुगोपाल यांना सांगितले आहे. चार वर्षांनंतर वेणुगोपाल यांनी हा आढावा घेतला आहे.  काही गोष्टी ज्या पद्धतीने घडल्या आहेत, त्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. या गोष्टींवर बोलणे आवश्यकच आहे. हा लोकशाही असलेला पक्ष असून, चर्चा केल्याशिवाय गोष्टी स्पष्ट होऊ शकत नाहीत. मी माझे म्हणणे मांडले असून वेणुगोपाल यांनी यात लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे, असे पाटकर म्हणाले.




मी हे देखील सांगितले आहे की, काँग्रेस हा फक्त काही जणांचा पक्ष नाही. हा पक्ष बांधण्यासाठी लोकांनी गेली साडेचार वर्षे आपला वेळ, पैसा, ऊर्जा आणि घाम गाळले आहे. हे लोक सुद्धा या बैठकीचा भाग असायला हवेत, अशी मागणी मी केली आहे. त्यानंतर वेणुगोपाल यांनी सर्वांशी बोलण्याचे आश्वासन दिले. आमचा लढा हा भाजपविरोधात आहे, गिरीश चोडणकर यांच्याविरोधात नाही, असा खुलासा पाटकर यांनी केला. सध्या वेणुगोपाल यांची असंतुष्ट पदाधिकाऱ्यांसोबत ‘वन टू वन’ बैठक सुरू आहे. दुपारी ३ वाजेनंतर वेणुगोपाल कार्यकारिणीची बैठक घेतील आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत बैठकीविषयी माहिती देतील.

हेही वाचा
सर्व पहा