Home >> गोवा >> ऑनलाईन फसवणूक सुरूच; बनावट बॅंक कर्मचाऱ्याने ४.२६ लाख लाटले

ऑनलाईन फसवणूक सुरूच; बनावट बॅंक कर्मचाऱ्याने ४.२६ लाख लाटले

मांद्रे पोलिसांनी नोंदवला अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21 mins ago
ऑनलाईन फसवणूक सुरूच; बनावट बॅंक कर्मचाऱ्याने ४.२६ लाख लाटले

पणजी : गोव्यात ऑनलाईन फसवणुकीचे  (Online Fraud in Goa) प्रकार सुरूच आहेत. पेडणे तालुक्यातील वाईडोंगर-पार्से येथील एका व्यक्तीची स्वतःला इंडसइंड बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून तब्बल ४ लाख, २६ हजार, ७९९ रुपये लाटण्यात आले.  या प्रकाराने ऑनलाईन फसवणुकीत आणखी एका तक्रारीची भर पडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मांद्रे  पोलिसांनी  (Mandrem Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिगंबर रामचंद्र पेटकर (रा. जय मल्हार मालदारवाडा, वाईडोंगर‍, पार्से, पेडणे)  यांनी दिलेल्या तक्रारीवरून २ जुलै २०२६ रोजी रात्री ११.१३ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. 

तक्रारीनुसार, १ मे २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने स्वतःला इंडसइंड बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून फिर्यादीशी संपर्क साधला. त्याने फिर्यादीला एक ऑनलाइन फॉर्म भरण्यास प्रवृत्त केले.

फॉर्म भरताना फिर्यादीने आपल्या बँक खात्याशी संबंधित माहिती भरल्यानंतर आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे ओटीपी/सुरक्षा कोड मिळवून घेतला. त्यानंतर फिर्यादीच्या बॅंक खात्यातून ४ लाख, २६ हजार, ७९९ रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केली.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा