२४ विरोधी पक्षांची सरन्यायाधीशांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी

नवी दिल्ली : आगामी विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी विरोधी पक्षांच्या आघाडीने सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना लिहिलेल्या संयुक्त पत्रातून केली आहे. या पत्रात देशातील निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता आणि लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान प्रणाली लागू करण्याचाही गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
२४ विरोधी पक्ष आणि अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांच्या स्वाक्षरी असलेल्या आठ पानी पत्रात विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेला "मोठे अपयश" असे संबोधण्यात आले आहे.
पत्रात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या अनेक प्रकरणांमध्ये आयोगाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (EVM) वापराबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व्यापक सार्वजनिक चर्चा होण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान प्रणाली लागू करण्याचाही गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.