Home >> देश -परदेश >> हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ११ जणांचा मृत्यू

हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ११ जणांचा मृत्यू

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, अरुणाचल प्रदेशातही फटका

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
हिमाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ११ जणांचा मृत्यू

 शिमला : हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध ठिकाणी ११ जणांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील ४६ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरड कोसळणे आणि अतिवृष्टीमुळे वीज व पाणीपुरवठा व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. भारतीय हवामान विभागाने ५ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कर्नाटक, महारष्ट्र, उत्तरप्रदेश, अरुणाचल प्रदेशातही पावसाचा फटका बसला आहे. 

राज्य आपत्कालीन संचालन केंद्राच्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील १८, मंडीतील १५, सिरमौरमधील ९ तसेच लाहौल-स्पिती आणि ऊना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन रस्ते बंद आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील १८१ वीज ट्रान्सफॉर्मर बंद पडले आहेत. सहा पाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका पाँटा साहिब परिसराला बसला असून येथे १००.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कांग्रा, जुब्बरहट्टी आणि भुंतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद करण्यात आली.

दरम्यान, बुधवारी राज्यात पावसाशी संबंधित चार जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चंदीगड-मनाली महामार्गावर दरड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे ३० सदस्यांचे पथक शिमला येथे तैनात करण्यात आले आहे. 

मंगळुरूत ३, उत्तरप्रदेशात दोघांचा मृत्यू 

देशातील इतर राज्यांनाही मान्सूनच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकमधील मंगळुरू येथे दरड कोसळून एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशात वीज पडून दोन जणांचा मृत्यू आणि आठ जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच शैक्षणिक संस्थांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अरुणाचल प्रदेशात पूर 

अरुणाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलनानंतर मदत व बचावकार्य सुरू असून पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात ४ ते ७ जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात नैऋत्य मान्सूनचा वेग वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.