सीसीटीव्ही फुटेजवरून चोरी पूर्व नियोजित असल्याचा संशय. पर्वरी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चार संशयितांचा केला शोध सुरू

पणजी : गोव्यातील तोर्डा-पर्वरी येथील 'हायलँड्स व्हिला' या गेटेड संकुलात एकाच रात्रीत तब्बल सात व्हिला फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे पर्वरी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोवीस तास सुरक्षा कवच असलेल्या या हाय-प्रोफाइल सोसायटीत चोरट्यांनी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केले त्याने स्थानिक कायदा आणि सुव्यवस्थेसोबतच खाजगी सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास संकुलाचे मुख्य कुंपण ओलांडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एकामागून एक करत सात वेगवेगळ्या व्हिलाच्या खिडक्या आणि मुख्य दरवाजांचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला. चोरट्यांनी ज्या सात घरांना आपले लक्ष्य केले, त्यातील काही घरे सध्या रिकामी म्हणजेच रहिवासी नसलेली होती, त्यामुळे चोरांच्या हाती काहीच लागले नाही. संकुलाच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी सहा सुरक्षा रक्षक तैनात असतात आणि तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची सक्तीने नोंद ठेवली जाते. असे असतानाही चोरटे इतक्या सहजतेने सुरक्षा भेदून आत घुसल्यामुळे स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आमदार आणि पोलिसांकडून पाहणी
घटनेची माहिती मिळताच गोवा पोलीस आणि स्थानिक आमदार रोहन खंवटे यांनी आज हायलँड्स संकुलाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार खंवटे यांनी परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक तपासादरम्यान हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले असता, चोरीचा प्रयत्न पूर्णपणे 'प्री-प्लॅन्ड' होता असे दिसून येत आहे. तसेच या गुन्ह्यात अंदाजे चार संशयित चोरट्यांचा सहभाग असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान चार अज्ञात चोरांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे
आमदार खंवटे यांनी पर्वरी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले असून, या सुरक्षेच्या गंभीर त्रुटीबाबत ते स्वतः मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक (DGP) आणि पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत. तसेच, व्हिला व्यवस्थापन आणि रहिवाशांना डिजिटल सुरक्षा यंत्रणा तातडीने सुधारण्याचे आवाहन करण्यात आले असून, या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.