Home >> गोवा >> मॅरेथॉन बैठकीनंतरही अंतर्गत धुसफूस कायम; काँग्रेस श्रेष्ठी 'डॅमेज कंट्रोल' मोडमध्ये

मॅरेथॉन बैठकीनंतरही अंतर्गत धुसफूस कायम; काँग्रेस श्रेष्ठी 'डॅमेज कंट्रोल' मोडमध्ये

गोव्यात काँग्रेस पक्ष एकसंध; आगामी निवडणुकीत पक्षाला बहुमत मिळून तो सत्तेवर येईल : के. सी. वेणुगोपाल, राष्ट्रीय सरचिटणीस, काँग्रेस

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
6 hours ago
मॅरेथॉन बैठकीनंतरही अंतर्गत धुसफूस कायम; काँग्रेस श्रेष्ठी 'डॅमेज कंट्रोल' मोडमध्ये

पणजी : प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षात जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचे दर्शन चर्चा तसेच बैठकीच्या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना झाले. पक्षांतर्गत धुसफूस आणि 'गोवा काँग्रेस पार्टी' स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर श्रेष्ठींकडून डॅमेज कंट्रोलची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे सध्यातरी परिस्थिती 'जैसे थे' राहील, असे चित्र आहे.

काँग्रेस पक्ष एकसंध असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल, तसेच बहुमताने काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास के. सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. दुपारी ते दाबोळी विमानतळावरून दिल्लीला गेले.

आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्याशी 'वन टू वन' (वैयक्तिक) चर्चा करण्यासोबतच वेणुगोपाल यांनी बैठका घेतल्या. राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासोबतच त्यांनी संघटनात्मक कार्य करण्याचा सल्ला दिला. काही जणांनी असमाधान व्यक्त केले असले, तरी पक्षात कोणत्याही प्रकारची दुफळी नाही, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले आहे.

गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक झाल्यानंतर अमित पाटकरांसह बरेच जण नाराज आहेत. पक्षात असंतोष असतानाच 'गोवा काँग्रेस पार्टी' स्थापन करण्याविषयीची नोटीस जारी झाली. ही पार्टी स्थापन होण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. मात्र, काँग्रेसमधील असंतुष्टांकडूनच गोवा काँग्रेस पार्टी स्थापन केली जात आहे, अशी चर्चा सुरू झाली. गिरीश चोडणकर यांच्या नेमणुकीमुळे जे कोणी दुखावले गेले आहेत, त्यांचाच हात या नवीन पार्टीमागे आहे, असा आरोप फादर एरमितो रिबेलो यांनी केला होता.

याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचे गोव्यात आगमन झाले. शनिवारी दिवसभर त्यांनी बैठका घेतल्या. अमित पाटकर यांची हकालपट्टी केल्यामुळे नाराज झालेले मनिषा उजगावकर तसेच अल्पसंख्याक समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. या सर्वांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली.

रविवारी देखील महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतीक्षा खलप, जोएल आंद्राद तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले दत्तप्रसाद नाईक यांनीही वेणुगोपाल यांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीविषयी चर्चा केली.



हेही वाचा
सर्व पहा