Home >> गोवा >> गोव्यात मुसळधार पाऊस-वादळी वाऱ्याची जुगलबंदी; जनजीवन विस्कळीत

गोव्यात मुसळधार पाऊस-वादळी वाऱ्याची जुगलबंदी; जनजीवन विस्कळीत

राज्यभरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. डिचोली, सत्तरी, मडगाव आणि फोंडा भागात घरे तसेच वीज खांब आणि रस्त्यांवर झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाने मदतकार्य सुरू केले आहे. वाचा सविस्तर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12 hours ago
गोव्यात मुसळधार पाऊस-वादळी वाऱ्याची जुगलबंदी; जनजीवन विस्कळीत

पणजी : गोव्यात मागील २४ तासांत हवामान लक्षणीयरित्या बदलले आहे. काल सायंकाळपासून गोव्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर अत्यंत तीव्र झाला असून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाच्या जुगलबंदीमुळे अनेक ठिकाणी मोठी पडझड झाली. अनेक महत्त्वाच्या मार्गांवर झाडे कोसळल्याने वाहतूक व्यवस्था काही काळासाठी कोलमडली, तर अनेक रहिवासी घरांवर झाडे पडल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी वित्तीय नुकसानीचा आकडा मात्र लाखांच्या घरात गेला आहे. काही ठिकाणी झाडे वीज खांबांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. वीज खात्याचे कर्मचारी तो सुरळीत करत आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण होताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेतले.


सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा; जनजीवन विस्कळीत


चोवीस तासांत पावसाचा सर्वात मोठा फटका डिचोली आणि सत्तरी तालुक्याला बसल्याचे दिसून आले. काल सायंकाळी सुटलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे डिचोली भाजी मार्केट संकुलावरील पत्र्याचे छप्पर उडून गेले, ज्यामुळे येथील स्थानिक विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये, फळे व भाजीपाल्यांवर पडल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे, पर्वरी येथील पैठण भागात विनायक पाल यांच्या घरावर एक मोठे झाड कोसळल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाळपई येथील ढावे भागात थेट ट्रान्सफॉर्मरवरच झाड कोसळल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली, तर ढवळी स्मशानभूमीजवळील सर्व्हिस रोडवर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती, जी नंतर अग्निशामक दलाने तातडीने मोकळी केली. खोर्जूवे भागातही एका घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे.




 नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिर परिसरात उभ्या असलेल्या एका जीपवर झाड उन्मळून पडले. या झाडाच्या फांद्या इतक्या जड होत्या की त्यांच्या ओझ्यामुळे परिसरातील दोन विजेचे खांब देखील मोडून पडले, ज्यामुळे संपूर्ण भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झाला होता. शनिवारीदेखील संपूर्ण राज्यभरात पावसाचा हा धुमाकूळ सुरूच होता. विशेषतः सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसासोबत आलेल्या तीव्र चक्रीवादळाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत करून टाकले. 



सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा

सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकरमळी, खडकी, भेडशीवाडा, भुईपाल, दाबे, हेदोडे, पाडेली, धामसे आणि म्हाऊस या गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली असून भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत अनेक घरांवरील झाडे वेळेत हटवून लाखोंची मालमत्ता वाचवली. खडकी शिवाजीनगर येथील बुध हरिजन यांच्या घरावर जंगली झाड पडून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले, तर म्हाऊस पंचायत क्षेत्रातील दाबे येथील संगीता गावस यांच्या घरावर झाड पडून २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोपार्डे धनगरवाडी रस्त्यावर अकेशियाचे झाड पडून तीन वीज खांब मोडून पडले होते. वीज खात्याचे सहाय्यक अभियंता अरविंद गावडे यांच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून अवघ्या ४ तासांत हा वीजपुरवठा पूर्वपदावर आणला. या संपूर्ण बचावकार्यात ज्ञानेश्वर गावस यांचे मार्गदर्शन लाभले.


या नैसर्गिक आपत्तीनंतर राजकीय पातळीवरूनही तातडीने पावले उचलली जात आहेत. पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी बाधित क्षेत्रांचा सविस्तर आढावा घेतला असून, ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे तात्काळ सर्वेक्षण करून आर्थिक मदत दिली जाईल आणि घरांची दुरुस्ती केली जाईल असे स्पष्ट केले आहे. तसेच वाळपई मतदारसंघाचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही सर्व नुकसानग्रस्तांना आवश्यक त्या स्तरावर आर्थिक मदत आणि घरदुरुस्तीचे पूर्ण आश्वासन दिले आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव आणि परिसरामध्येही बाणावली, घोगळ आणि दवर्ली भागात झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या. बाणावली येथे विन्सेंट बारच्या मागे एका झाडाची मोठी फांदी वीज वाहिनीवर कोसळली होती, तर घोगळ येथील चिन्मय मठाजवळ सकाळी मोठे जंगली झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दवर्ली येथे मशिदीजवळ मोठे फणसाचे झाड मुळासकट उपटून घरावर पडण्याच्या धोकादायक स्थितीत असताना मडगाव अग्निशामक दलाने ते सुरक्षितपणे बाजूला केले.



फोंडा तालुक्यातही उसगाव पंचायत क्षेत्रातील टाकीवाडा आणि तिस्क-उसगाव येथे दोन घरांवर झाडे कोसळली. तिस्क-उसगाव येथील संगम पार्सेकर यांच्या घरावर तसेच शौचालयावर झाड कोसळल्याने ३० हजार रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले, मात्र घरातील लोक मागच्या खोलीत असल्याने सुखरूप वाचले. टाकीवाडा येथील दिलीप मळकर्णेकर यांच्या घराचे छप्पर फुटल्याने पावसाचे पाणी घरात शिरले होते. काणकोण तालुक्यातील पाटणे-कोळंब येथे कोकण रेल्वेचे माजी कर्मचारी अभय धुरी यांच्या घरावर वर्षावनातील एक विशाल वृक्ष कोसळल्याने १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

साखळी-वाळपईत पावसाची जोरदार बॅटिंग

सरकारी आकडेवारीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत साखळी येथे सर्वाधिक ९१.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर वाळपई येथे ८५ मिमी पाऊस पडला असून दोन्ही ठिकाणे मुसळधार पावसाच्या श्रेणीत आहेत. याशिवाय पेडणे ६४ मिमी, म्हापसा ६४ मिमी, फोंडा ४५.८ मिमी आणि पणजीत २२.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


Image

हेही वाचा
सर्व पहा