विधानसभेचा आखाडा : वाळपई

मतदारसंघावर भाजपची मजबूत पकड
काँग्रेसचा अस्तित्वासाठी संघर्ष
आरजीची मते कुणाकडे जाणार याची उत्सुकता
रोजगाराचा प्रश्न ठरणार निर्णायक
गोवन वार्ता प्रतिनिधी
वाळपई : उत्तर गोव्यातील वाळपई विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक चर्चेतील आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. एकेकाळी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आज भाजपच्या ताब्यात असून, त्यामागे आरोग्यमंत्री विश्वजीत प्रतापसिंह राणे यांचे नेतृत्व हे प्रमुख कारण आहे. २००७ पासून सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विश्वजीत राणे आगामी विधानसभा निवडणुकीतही भाजपचे उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे. मात्र त्यांना आव्हान कोण देणार, विरोधक कोणती रणनीती आखणार आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार, याबाबत राजकीय वर्तुळात आतापासूनच चर्चा सुरू आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला थेट आव्हान देण्यात काँग्रेस अपयशी ठरली होती. उलट रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी (आरजीपी) चे उमेदवार मनोज परब यांनी शांत, मुद्देसूद आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार करून विश्वजीत राणेंना चांगलीच टक्कर दिली होती. सुमारे साडेसहा हजार मते मिळवून त्यांनी काँग्रेसला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र आता आरजी पक्षाची परिस्थिती बदलली असून त्याचा फायदा कोणाला होणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
विश्वजीत राणेंमुळे वाळपईत भाजप मजबूत
विश्वजीत राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर वाळपई मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पंचायत, नगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये भाजपचे समर्थक सत्तेत आहेत. मतदारसंघातील नगरगाव, सावर्डे, गुळेली, खोतोडा, उसगाव-गांजे पंचायत आणि वाळपई नगरपालिका या भागांमध्ये भाजपने प्रभावी संघटन उभे केले आहे. वाळपई नगरपालिकेचे मंडळ सध्या बरखास्त असून प्रशासकांकडे कारभार आहे. गेल्या काही वर्षांत विविध विकासकामे, आरोग्य सेवा, रस्ते, पाणीपुरवठा, पर्यटन आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून भाजपने मतदारसंघात आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधक कमकुवत; काँग्रेसची अस्तित्वासाठी धडपड
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वाळपई मतदारसंघात आज काँग्रेस अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत स्थानिक पातळीवर पक्षाने सातत्याने जनआंदोलने, संघटनबांधणी किंवा प्रभावी लोकसंपर्क मोहिमा राबविलेल्या नाहीत. जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवार उभे करूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वबदलानंतर स्थानिक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मनीषा उसगावकर यांच्यावर झालेल्या शिस्तभंग कारवाईमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी कमी झाल्याचे मानले जाते.
मिलिंद प्रभूंची सामाजिक चळवळ; राजकीय एंट्रीची चर्चा
दरम्यान, उसगाव-गांजे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद प्रभू यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, रोजगारविषयक मोफत मार्गदर्शन आणि युवकांशी सातत्याने संवाद साधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविणे, बेरोजगार युवकांना स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन करणे आणि सामाजिक प्रश्नांवर भूमिका मांडणे यामुळे त्यांची चर्चा वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतील, याबाबत मात्र अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
मुस्लिम मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची
वाळपई मतदारसंघातील राजकीय समीकरणात वाळपई नगरपालिकेतील मुस्लिम मतदार महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकसभा निवडणुकीत अनेक प्रभागांत काँग्रेसला तुलनेने अधिक मते मिळाल्याचे चित्र दिसले, तर विधानसभा निवडणुकीत मात्र विश्वजीत राणेंना मुस्लिम समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निकालातून स्पष्ट झाले होते. राष्ट्रीय स्तरावरील काही घडामोडींमुळे मुस्लिम मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली, तरी स्थानिक पातळीवर विश्वजीत राणे यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत सातत्याने सहभाग घेत संवाद कायम ठेवला आहे. आगामी निवडणुकीत मुस्लिम मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
रोजगाराचा प्रश्न ठरणार सर्वांत मोठा निवडणूक मुद्दा
सत्तरी तालुक्यातील सर्वांत गंभीर प्रश्न म्हणजे सुशिक्षित बेरोजगारी. गोवा स्टाफ सिलेक्शन आयोगाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर युवक रोजगाराच्या अपेक्षेने प्रयत्न करत असले तरी स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या नसल्याची भावना आहे. यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष वाढल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीपूर्वी रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्याचा राजकीय फटका भाजपला बसू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
विश्वजीत राणेंचा सातत्यपूर्ण जनसंपर्क
आगामी निवडणूक लक्षात घेऊन विश्वजीत राणे यांनी पंचायत स्तरावर बैठका, युवक मेळावे, पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद, सामाजिक कार्यक्रम आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनांद्वारे मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. विशेषतः युवकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांनी भर दिला असून पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये नव्या मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
आरजी पक्षाची ६ हजारांहून अधिक मते कुणाकडे?
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाचे मनोज परब ६,३७७ मते मिळवून दुस ऱ्या क्रमांकावर राहिले होते. मात्र सध्या आरजी पक्षाची ताकद कमी झाल्याने ही मते आगामी निवडणुकीत कोणाकडे वळतील, हा मोठा प्रश्न आहे. ही मते भाजपकडे गेल्यास विश्वजीत राणेंचे वर्चस्व आणखी मजबूत होऊ शकते. ती मते काँग्रेस किंवा अन्य विरोधी उमेदवारांकडे वळल्यास निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला वाळपई मतदारसंघात भाजप संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असल्याचे चित्र आहे. वैयक्तिक जनसंपर्क, विकासकामे आणि मजबूत संघटन ही विश्वजीत राणे यांची प्रमुख ताकद आहे. दुसरीकडे काँग्रेसला सक्षम नेतृत्वाची आणि संघटनात्मक पुनर्बांधणीची गरज आहे. आरजी पक्षाची मते, मुस्लिम मतदारांचा कल, सुशिक्षित बेरोजगारांचा रोष आणि संभाव्य नव्या उमेदवारांची एंट्री हे आगामी विधानसभा निवडणुकीचे निर्णायक घटक ठरणार आहेत.