पणजी :राज्यातील हरित निसर्ग आणि स्वच्छतेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येतात. त्यामुळे गोव्याला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून, प्रत्येक नागरिकानेही त्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. राज्याला हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
‘होम स्टे’ चालकांचा सत्कार
शनिवारी पणजी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि आशा वेर्णेकर उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘होम स्टे’ चालकांचा सत्कार करण्यात आला.
राज्यात अनेक ठिकाणी घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून रस्त्याच्या कडेला टाकण्याचे प्रकार घडत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक असून, स्वयंसेवी संस्थांनी (एनजीओ) व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवाहन केले.
वैद्यकीय पर्यटनावर भर
पर्यटन आणि इतर क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास उद्योजक आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. महिला आणि युवकांनी सरकारच्या विविध योजना व धोरणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. भविष्यात राज्यात वैद्यकीय पर्यटनाचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात येणार असून, त्यासाठी 'वेलनेस धोरण' जाहीर करण्यात आले आहे. मागील बारा वर्षांत राज्यात विविध विकासकामे झाली असून, शाश्वत विकासाची जबाबदारी आता पुढील पिढ्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘होम स्टे’ चालकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम देशात सर्वप्रथम गोव्यात सुरू करण्यात आला. पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.


