Home >> तरंग >> ‘बेरजेचे’ राजकारणच काँग्रेसला तारू शकते!

‘बेरजेचे’ राजकारणच काँग्रेसला तारू शकते!

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्ड आणि काॅंग्रेस वगळता इतर विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने भाजपचे फावले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आप, आरजी, गोवा फॉरवर्ड अशा घटकांनी साथ दिली म्हणून कॉंग्रेस उमेदवार दक्षिण गोव्यात विजयी ठरला. या अनुभवातून धडा घेत, काॅंग्रेस नेतृत्वाने मोठ्या भावाच्या भूमिकेतून विरोधकांची आघाडी मजबूत केली, तरच भविष्यात भाजपला टक्कर देता येईल.

Story: वर्तमान |
3 hours ago
‘बेरजेचे’  राजकारणच काँग्रेसला तारू शकते!

गोव्यासारख्या छाेट्या राज्यात एखादा राजकीय पक्ष काढणे आणि विधानसभेची निवडणूक लढविणे तसे सोपे. यापूर्वी असे जवळपास डझनभर पक्ष आले आणि काळाच्या ओघात लुप्तही झाले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयारीला लागली आहे. गिरीश चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदी स्वार होऊन ताज्या दमाने नेते, कार्यकर्त्यांची कुमक गोळा करण्याचा चंग बांधला. चर्चिल आलेमाव, प्रतिमा कुतिन्हो असे अनेक नेते पक्षाकडे आकृष्ट होत आहेत. अशा स्थितीत ‘गोवा काँग्रेस पार्टी’ नावाच्या पक्षाची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आला आणि गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. 

पक्षाच्या नावातील साधर्म्यामुळे काँग्रेसची मते फोडण्यासाठी केलेली ही उचापत असू शकते, असे सर्वसाधारण अनुमान सर्वांनीच काढले. ते चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. पण उद्या कोणी ‘गोवा भारतीय जनता पार्टी’ असा पक्ष काढायला गेला, तर काय प्रतिक्रिया असेल? कदाचित त्या प्रयोगाला कोणी गांभीर्याने घेणार नाही. कारण भाजपचा एक स्वतंत्र केडर आहे. कार्यकर्त्यांची हक्काची फौज आहे. कोणाही साध्या कार्यर्त्याला तिकीट देऊन आमदार करण्याची या पक्षात धमक आहे. म्हणूनच काेणी भाजप सोडून नवा पक्ष काढत असेल, तर त्याला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. याउलट काँग्रेसचे आहे. निदान गोव्यात तरी या पक्षाची संघटनात्मक ताकद भाजपइतकी प्रभावी नाही. सगळी मदार आहे ती जनता जनार्दनावर. ‘अँटी इन्कम्बन्सी’चा फायदा या पक्षाला दरवेळी होतो. नाही म्हणायला काही निष्ठावान कार्यकर्ते, नेते अधूनमधून लोकांच्या समस्या घेऊन सरकारशी भांडत असतात. दर निवडणुकीत एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे काही मतदारसंघात काँग्रेसची हक्काची मते कुठेही जात नाहीत. भाजपचा वरचष्मा असलेल्या अनेक मतदारसंघात काँग्रेसचा एक चाहता वर्ग डोळे झाकून काँग्रेस उमेदवाराला लक्षवेधी संख्येने मते बहाल करत असतो. २०२२च्या निवडणुकीचा आढावा घेतला, तर कुडचडे, वेळ्ळी, बाणावली, कुठ्ठाळी, दाबोळी, फोंडा, साखळी अशा सात मतदारसंघांत हजार-दोन हजार मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवाराचा पाडाव झाला. दरवेळी ‘धर्मनिरपेक्ष’ म्हटली जाणारी मते काँग्रेसच्या पारड्यात भरभरून पडत असतात. काँग्रेसच्या नेतृत्वाने याची गोळाबेरीज नक्कीच केली असेल. २०२२ मध्ये कॉंग्रेसचे ११ आमदार जिंकून आले, तर ७ जण थोड्याफार फरकाने यशस्वी होऊ शकले नाहीत. भाजपला ३,१६,५७३ तर काँग्रेसला २,२२,९४८ मते पडली. २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसला २,५९,७५८ तर भाजपला २,९७,५८८ मते पडली होती. याचाच अर्थ मधल्या पाच वर्षांत जी ४ टक्के मते भाजपने आपल्या बाजूने वळविली, तीच मते २०२२ मध्ये निर्णायक ठरली. शिवाय आप, आरजीपी, टीएमसी अशा पक्षांनी फोडलेली मते काँग्रेसच्याच वोटबँकेला लागलेली गळती होती, हे लक्षात घ्यायला हवे. विरोधी पक्षांची साथ हवी आहे ती यासाठीच.

 सद्यस्थितीत गाेवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षाने काॅंग्रेससोबत युती करण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. त्याला काँग्रेसकडूनही अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ही बोलणी अधिकृत पातळीवर आणि वस्तुस्थितीला धरून व्हायला हवी. केवळ युतीबाबत उत्सुकता दाखवून भागणार नाही. निवडणूक फार दूर नाही. त्या दृष्टीने भाजप कधीचीच तयारी करून दहा पावले पुढे पोहचला आहे. त्या तुलनेत काँग्रेससह इतर पक्ष बळेबळेच वाटचाल करताना दिसतात. एका बाजूला गिरीश चोडणकर यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागताच एक मोठा गट मरगळ झटकून कामाला लागला, तर दुसरीकडे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि त्यांचे सोबती वेगळ्याच दिशेकडे तोंड करून बसले. काँग्रेसमधील संघटनात्मक पातळीवरील बांधणीला चोडणकरांनी गती दिलेली असताना ही पक्षांतर्गत सुरू असलेली कुरबूर संघटनेच्या कार्याला मारक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर ‘गोवा काँग्रेस पार्टी’ नावाचे पिल्लू कोणी तरी सोडून दिल्याने त्याचा सर्वाधिक ताप काँग्रेसलाच झाला आहे, यात दुमत नसावे. या नामसाधर्म्यातून पारंपरिक मतपेढीत फाटाफूट होईल, याची जाणीव काँग्रेस नेत्यांना नक्कीच असेल. त्यामुळेच पक्षातील खदखद वेळीच शमवून भविष्यात घातक ठरू शकणारे कुठलेही बंड वेळीच थंड करण्यासाठी हायकमांडने पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना गोव्यात पाठवले असू शकते. वेणुगोपाल यांचा हा दौरा नियोजित असला, तरी त्याला पक्षांतर्गत कुरबुरी आणि ‘गोवा काँग्रेस पार्टी’ची पार्श्वभूमी असल्याने या मुद्द्यावरही त्यांच्याकडून स्थानिक नेतृत्वाशी चर्चेच्या फेऱ्या झडल्या. त्यात अमित पाटकर यांनी पक्षासोबत एकनिष्ठ असल्याची भूमिका स्पष्ट केल्याने काॅंग्रेसजनांना हायसे वाटले असेल. 

विजय सरदेसाईंसह गोवा फॉरवर्डच्या काही नेत्यांनी राज्यात अतिशय कष्टपूर्वक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. मांद्रे, काणकोण, मये, साळगाव, शिवोली अशा काही मतदारसंघांत गोवा फॉरवर्डला मानणारा वर्ग आहे. त्याचा उपयोग त्या पक्षाला एकहाती विजय मिळविण्यास कितपत होईल, हे आताच सांगता येत नाही. मात्र काँग्रेससोबत गोवा फॉरवर्डने जागा वाटपात तडजोड केली, तर मात्र चित्र काहीसे वेगळे दिसू शकते. हीच स्थिती आम आदमी पक्षाच्या बाबतीत दिसून येते. २०२२ च्या निवडणुकीत ‘धर्मनिरपेक्ष’ मतांची विभागणी झाली. त्यात ‘आप’ने बऱ्यापैकी मते खेचून घेतली. ६४,३५४ म्हणजेच जवळपास ७ टक्के मते मिळवून ‘आप’ने उपद्रवमूल्य सिद्ध केले. त्याचा फटका काँग्रेसला बसला. यातून धडा घेत दाेन्ही पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात एकच उमेदवार देऊन विजय संपादन केला. यावरून विरोधी पक्षांची एकी किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज आला. ती एकी प्रत्यक्षात आणणे हेच काँग्रेसच्या संभाव्य यशाचे गुपित असेल.

भाजपचा विजयरथ देशात दिमाखात दौडत आहे. गोव्यात २०२२ मध्ये ४० पैकी २० जागा मिळवून या पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र भाजपच्या सर्व क्लुप्तींना पुरून उरत काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात विजय संपादन केला. हाच चाणाक्षपणा आता दाखविण्याची वेळ आली आहे. आरजीपीतील अंतर्गत संघर्षामुळे त्या पक्षाच्या अस्तित्वावरच संकट आले आहे. तरीही या पक्षाला ९३,२५५ मतांचा जो जनाधार २०२२ मध्ये मिळाला, तो दुर्लक्षून चालणार नाही. अशा काही घटकांना सोबतीला घेऊन काँग्रेसला जावे लागेल. प्रसंगी मगो पक्षाला भाजपने दूर लोटले, तरी त्या पक्षालाही सोबत घेण्यास कचरता कामा नये. भाजपने ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे ते एका विशिष्ट रणनीतीच्या आधारे. काँग्रेसजवळ तितकी आक्रमक रणनीती कदाचित नसेल. भाजपला भारी पडू शकेल, अशी सर्वसमावेशक रणनीती आखून काम करण्याची वेळ टळत चालली आहे. अशा गाफील अवस्थेत निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच समविचारी पक्षांना सोबत घेऊन आताच मतदारसंघनिहाय काम सुरू व्हायला हवे. असंतुष्टांचे बंड होणारच आहे. त्याला पर्याय नाही. निदान लाेकांसमोर सक्षम राजकीय पर्याय उभा करण्याची संधी काँग्रेसने दवडता नये. त्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना विरोधकांची मोट कशी बांधता येईल आणि बहुमताचा आकडा कसा गाठता येईल, यासाठी ‘बेरजेचे राजकारण’ करण्याची गरज आहे. ते केले, तरच भाजपला टक्कर देणे सोपे जाईल. अन्यथा जे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आणि निवडणुकांनंतर घडले, तेच घडेल!

- सचिन खुटवळकर, (लेखक गोवन वार्ताचे वृत्त संपादक आहेत.)