गोवा छोटासा अवघी १५ लाख लोकसंख्या असलेला प्रदेश. इतके असूनही आपल्याला भर पावसाळ्यात उकाडा सहन करावा लागला. हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर वाढणारा ताण ही यामागची काही कारणे.

वाढदिवस म्हटला की ढिगभर संदेश, डझनभर फोन, केक कापणे, पार्टी करणे, मजा-मस्ती हे सारे आलेच. आपल्या वाढदिवशी आप्तेष्टांनी आणि स्वकीयांनी आपल्यासाठी काहीतरी खास करावे, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र याबाबतीत माझी मनसा थोडी वेगळी आहे. वाढदिवशी आई-बाबांनी माझे औक्षण करावे, भावंडांनी भरपूर फोटो काढावेत, भाचरांनी घरभर बागडावे, मित्र-मैत्रिणींनी आवर्जून फोन करावा (त्यानिमित्ताने गप्पा मारता येतात) आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी छोटेसे का होईना, पण एक सकारात्मक पाऊल उचलावे.
एरवी मी माझा वाढदिवस वृद्धाश्रमात, स्नेहमंदिरात किंवा विशेष मुलांच्या शाळेत भेट देऊन साजरा करते. यंदा मात्र एल-निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या भीतीने मला पर्यावरण केंद्रित विचार करायला भाग पाडले. वाटले, असे काहीतरी करावे, ज्याचा दीर्घकालीन परिणाम होईल. यंदाच्या या दिवसानिमित्त परमेश्वराने जितकी वर्षे पदरात टाकली, तितकी झाडे लावून त्या निसर्गरूपी ईश्वराचे आभार मानावेत, असे ठरवले.
यावर्षी माझा वाढदिवस गुरुवारी आला. गुरुवार हा कामाचा दिवस असल्याने वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी वृक्षारोपण करण्याचे ठरवले. माळरानावर, परसबागेत आणि रस्त्याच्या कडेला अनेक झाडे लावली. ग्रामस्थांच्या मदतीने आणि वन विभागाच्या सहकार्याने गावात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. सर्वांनी मिळून गावच्या भुतखांब पठारावर स्थानिक हवामानाला अनुकूल अशा विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड केली. या उपक्रमाला ग्रामस्थांचा भक्कम पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही झाडे मुळ धरेपर्यंत त्यांची काळजी घेण्याची जबाबदारीही सर्वांनी आनंदाने स्वीकारली.
एखादा वाचक म्हणेल, “माझा वाढदिवस तर थंडीच्या कडाक्यात येतो,” तर दुसरा म्हणेल, “ताई, आमचा वाढदिवस उन्हाळ्यात असतो. आम्हीही सामूहिक वृक्षारोपणच करायचे का?” अगदी तसे नाही. जून ते सप्टेंबर या कालावधीत गोव्यात भरपूर पाऊस पडत असल्याने वृक्षारोपणासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. म्हणतात ना, “इच्छा तेथे मार्ग.” हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आपण त्या-त्या ऋतूशी निगडित पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबवू शकतो.
जून ते सप्टेंबर हा वृक्षारोपणासाठी सर्वाधिक अनुकूल काळ मानला जातो. या काळात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून गोमंतकाला सदाहरित ठेवण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. या उपक्रमात आम्ही स्थानिक हवामानाला अनुरूप देशी प्रजातींची निवड केली. योग्य झाड योग्य ठिकाणी लावले, तरच त्याची वाढ चांगली होते आणि स्थानिक परिसंस्थेलाही त्याचा लाभ होतो. उदा. कडक ऊन सहन करणाऱ्या माळरानावर जर जास्त पाण्याची गरज भासणारे रोप लावले किंवा एखाद्या पाणथळ प्रदेशात जर कमी पाणी शोषणारे रोप लावले, तर ते वाचेल का? अर्थातच नाही. म्हणूनच ते-ते झाड त्या-त्या प्रदेशात लावणे अनिवार्य आहे. देशी वृक्षांची निवड करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे स्थानिक वन्यजीवांचे संरक्षण. अनेक पक्षी व प्राणी विशिष्ट झाडांवर अवलंबून असल्याने परिसंस्थेचे संतुलन राखण्यासाठी देशी प्रजातींची लागवड महत्त्वाची ठरते. झाडांची अदलाबदल किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीची झाडे लावल्यास त्या प्रदेशातील पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीती असते.
यानंतरचा काळ म्हणजे ऑक्टोबर ते जानेवारी. या महिन्यांत अनेक स्थलांतरित पक्षी गोव्यात येतात. तसेच पश्चिम घाटात रंगीबेरंगी फुलपाखरांचे थवेही पाहायला मिळतात. पाणथळ प्रदेशांची स्वच्छता करणे, युवा पिढीला पक्षी व फुलपाखरांची ओळख करून देण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिके आयोजित करणे यांसारखे उपक्रम या काळात राबवता येऊ शकतात. फेब्रुवारी ते मे या कालावधीत वाढदिवस साजरा करणारे वाचक पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी शोषखड्डे खणण्याचा सामूहिक उपक्रम हाती घेऊ शकतात.
गोवा छोटासा अवघी १५ लाख लोकसंख्या असलेला प्रदेश. इतके असूनही आपल्याला भर पावसाळ्यात उकाडा सहन करावा लागला. हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर वाढणारा ताण ही यामागची काही कारणे. पण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून केलेला छोटेसा प्रयत्न मोठा बदल घडवू शकतो. तूर्तास इतकेच. मात्र तुमचा वाढदिवस तुम्ही पर्यावरण संवर्धनासाठी कोणते पाऊल उचलून साजरा केला, हे आम्हाला नक्की कळवा. कारण आपण आज उचललेले छोटेसे पाऊल उद्याच्या पिढीचे भविष्य खऱ्या अर्थाने ‘हॅप्पी’ करू शकते.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे)