प्रत्येक गावच्या फुटबॉल मैदानावरून आणि प्रत्येक मॅचमधून एकच संदेश दिला जात असेल की, 'ही जागा जशी होती, त्यापेक्षा अधिक चांगली आणि स्वच्छ करूनच पुढे जा', अशी एकदा कल्पना तर करून पहा. ही साधी नैतिक सवय इतर सार्वजनिक ठिकाणीही पोहचेल आणि आपल्या नागरी जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकेल.

गोव्याचे आणि फुटबॉलचे नाते नेहमीच खूप खास राहिले आहे. गावाकडची मैदाने असोत की शाळेची ग्राउंड्स, फिफा (FIFA) वर्ल्ड कपचा ज्वर गोव्यातील घराघरांमध्ये कसा रेंगाळतो, हे मॅचनंतर होणाऱ्या चर्चांवरून सहज दिसते. गोव्यातील स्थानिक फुटबॉल टूर्नामेंट्स नेहमीच सार्वजनिक अभिमानाचा विषय ठरल्या आहेत. गोव्यात फुटबॉल ही एक प्रकारे सर्वांना जोडणारी सामाजिक भाषाच बनली आहे. पण सध्या, फुटबॉलच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्याच गोष्टीसाठी जपानने जगभराचे लक्ष वेधून घेतले आहे.
१९९८ च्या वर्ल्ड कपपासून जपानी चाहते मॅच संपल्यानंतरही स्टेडियममध्ये थांबून कचरा गोळा करताना दिसतात. इतकेच नाही, तर तिथली टीम स्वतःचे ड्रेसिंग रूम अगदी चकाचक करून सोडते आणि अनेकदा कृतज्ञता पत्रसुद्धा लिहून ठेवते. त्यांचे हे सातत्य पाहून जगभरातून त्यांचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, हे ते टाळ्या मिळवण्यासाठी करत नाहीत, तर ती त्यांची अंगवळणी पडलेली सवय आहे. ही विशिष्ट सवय त्या देशाच्या संस्कृतीची खरी ओळख करून देते.
जपानी समाज हा शिस्त, संयम आणि इतरांबद्दल आदर बाळगणारा समाज आहे. अशी नागरी वर्तणूक कधी अचानक किंवा अपघाताने घडत नसते. जेव्हा संस्कृती, शिक्षण आणि सामाजिक अपेक्षा या गोष्टींना पाठबळ देतात, तेव्हाच अशी वृत्ती वाढीस लागते. जेव्हा लोकांना मनापासून असे वाटते की कचरा करणे म्हणजे केवळ अस्वच्छता पसरवणे नसून ही गोष्ट सामाजिकदृष्ट्या अयोग्यही आहे, तेव्हा त्यांच्या वागण्यात बदल घडतो. थोडक्यात सांगायचे तर, अस्वच्छता न करणे म्हणजे केवळ एक शिकवण नव्हे; तर ती एक सामूहिक सामाजिक जबाबदारी आहे.
मानसशास्त्र या गोष्टीला 'सोशल लर्निंग थिअरी'च्या माध्यमातून अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करत. या सिद्धांतानुसार, आपल्या आजूबाजूला जे घडते, जे वारंवार दाखवले जाते आणि ज्याचे कौतुक होते, ते पाहून आपण खूप काही शिकत असतो. जपानमध्ये स्वच्छता ही केवळ एक सवय नसून ती शाळा, घरे, कामाची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाळली जाणारी एक सामाजिक पद्धत आहे. तिथली मुले लहानाची मोठी होताना मोठ्या माणसांना वर्ग साफ करताना, कचऱ्याचे वर्गीकरण करताना आणि इतरांचा विचार करताना पाहतात.
कालांतराने ही स्वच्छता त्यांच्या जगण्याचा एक मापदंड बनते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ही स्वच्छता आधी सामाजिक आचरणातून शिकली जाते आणि नंतर ती मनावर एवढी ठसते की ती माणसाचा स्वभावच बनून जाते. पुढे जाऊन सामाजिक मान्यता आणि आपलेपणाच्या भावनेमुळे या सवयी अधिक घट्ट होतात.
आपल्या देशाचा विचार केला, तर ईशान्य भारत याचे एक उत्तम उदाहरण आहे. मेघालयातील 'मावलिनॉन्ग' या गावाला भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते. या भागातील अहवाल असे सांगतात की, तिथली स्वच्छता केवळ सरकारी नियमांमुळे नाही, तर घरातून मिळालेल्या सवयी आणि स्थानिक संस्कृतीमुळे टिकून आहे. तिथले रहिवासी सांगतात की स्वच्छता ही त्यांना लहानपणापासून शिकवली जाते आणि संपूर्ण समाजाच्या सहभागातून ती राखली जाते.
येथूनच गोव्याला प्रेरणा घेण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणावर येणारे पर्यटक आणि वाढत्या शहरीकरणामुळे गोव्यासमोरही सार्वजनिक जागा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे रोजचे आव्हान आहे. ही नागरी कर्तव्ये केवळ कंत्राटी कामगार किंवा म्युनिसिपालिटीच्या कर्मचाऱ्यांवर सोडून चालणार नाही. नागरिकांनी स्वच्छतेला स्वतःच्या अस्मितेचा भाग मानले पाहिजे. एखादी जागा किती स्वच्छ आहे, यावरून तिथला समाज स्वतःकडे कसा पाहतो हे सिद्ध होते. गोव्याने कोणत्याही देशाचे अंधानुकरण न करता, अस्वच्छतेविरुद्ध अशी संस्कृती निर्माण करावी जिथे स्वच्छता ही स्वाभिमान, आपुलकी आणि सार्वजनिक अभिमानाशी जोडलेली असेल.
शाळा, स्थानिक क्लब्स, पंचायती, हाऊसिंग सोसायट्या आणि कॉर्पोरेट संस्था आपापल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. पण, खेळाचे मैदान आणि विशेषतः फुटबॉल, हे या नागरी सवयींचे मॉडेलिंग करण्यासाठी एक प्रभावी माध्यम बनू शकते का? जर फॅन्सनी मैदानावर आनंदोत्सव साजरा करूनही जाताना ते मैदान पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ ठेवले, तर ही सवय स्टेडियमच्या बाहेर पडून सिनेमा हॉल्स, विमाने, जत्रा आणि मोठ्या सणांपर्यंत सहज पोहोचू शकते. स्वच्छता मोहिमांमुळे केवळ जागरूकता निर्माण होते, पण खरी संस्कृतीच सवयींना कायमस्वरूपी टिकवून ठेवते.
फुटबॉलवरील अथांग प्रेम आणि इथला स्वाभिमान पाहता, गोवा हे राज्य अशी संस्कृती घडवून आणण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे. प्रत्येक गावच्या फुटबॉल मैदानावरून आणि प्रत्येक मॅचमधून एकच संदेश दिला जात असेल की, 'ही जागा जशी होती, त्यापेक्षा अधिक चांगली आणि स्वच्छ करूनच पुढे जा', अशी एकदा कल्पना तर करून पहा. ही साधी नैतिक सवय इतर सार्वजनिक ठिकाणीही पोहचेल आणि आपल्या नागरी जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकेल. गोव्यासाठी ही सवय खरोखरच एक मोठा 'गेम चेंजर' ठरू शकेलं.
डॉ. उबाल्दिना नोरोन्हा, (लेखिका: माजी सहयोगी प्राध्यापिका, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)