Home >> तरंग >> झटपट आणि हॉटेलसारखी चवदार कोळंबी तंदूर

झटपट आणि हॉटेलसारखी चवदार कोळंबी तंदूर

Story: चमचमीत रविवार |
04th July, 11:53 pm
झटपट आणि हॉटेलसारखी चवदार कोळंबी तंदूर

साहित्य: कोळंबी (मोठ्या आकाराची): १० ते १२ (स्वच्छ केलेली आणि पाठीवरील काळी शीर काढलेली)

आलं-लसूण पेस्ट: १ मोठा चमचा

लिंबाचा रस: १ ते २ मोठे चमचे

घट्ट दही : ३ मोठे चमचे

काश्मिरी लाल तिखट: २ छोटे चमचे (छान रंगासाठी)

तंदुरी मसाला: १ मोठा चमचा

गरम मसाला: अर्धा छोटा चमचा

कसुरी मेथी: १ छोटा चमचा

हळद: अर्धा छोटा चमचा

चाट मसाला: १ छोटा चमचा

तेल किंवा बटर: २ ते ३ मोठे चमचे

मीठ: चवीनुसार

कोळशाचा तुकडा: १ (धुरी देण्यासाठी, ऐच्छिक)


कृती:  सर्वात आधी स्वच्छ केलेली कोळंबी एका भांड्यात घेऊन त्याला लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट आणि थोडे मीठ लावून १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या (हे पहिले मॅरिनेशन). आता दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात घट्ट दही, काश्मिरी लाल तिखट, तंदुरी मसाला, गरम मसाला, हळद, कसुरी मेथी, चाट मसाला, एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ एकत्र करून घ्या. हे सगळे मसाले व्यवस्थित फेटून एकजीव केल्यावर, त्यात आधी मॅरिनेट केलेली कोळंबी टाकून मसाल्याचे कोटिंग कोळंबीला सर्व बाजूंनी नीट लावून घ्या. हे मिश्रण कमीत कमी अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवून द्या, ज्यामुळे मसाल्यांची चव कोळंबीमध्ये छान मुरेल.

जर तुम्हाला हॉटेलसारखा अस्सल कोळशाचा सुवास हवा असेल, तर मॅरिनेट केलेल्या कोळंबीच्या भांड्यात मध्यभागी एक छोटी वाटी ठेवा; त्यात कोळशाचा तुकडा गॅसवर लाल होईपर्यंत तापवून ठेवा आणि त्यावर थोडे तूप किंवा तेल टाकून धूर निघू लागताच भांड्यावर ५ मिनिटे घट्ट झाकण ठेवून द्या. यानंतर कोळंबी तंदूर बनवण्यासाठी तुम्ही तंदूरच्या सुऱ्यांचा (Skewers) वापर करू शकता किंवा थेट पॅनवर बनवू शकता. गॅसवर एक नॉन-स्टिक पॅन किंवा ग्रिल पॅन गरम करून त्यात थोडे बटर किंवा तेल टाका आणि मॅरिनेट केलेली कोळंबी एक-एक करून पॅनवर ठेवा. मध्यम ते उच्च आचेवर कोळंबी दोन्ही बाजूंनी ३ ते ४ मिनिटे छान तांबूस डाग येईपर्यंत ग्रिल करून घ्या (कोळंबी जास्त वेळ शिजवू नका, नाहीतर ती रबरासारखी कडक होते). दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून झाल्यावर वरून थोडे बटर लावा, चाट मसाला भुरभुरा आणि गरमागरम कोळंबी तंदूर पुदिन्याची चटणी, कांदा व लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह करा.

शिल्पा रामचंद्र, मांद्रे