Home >> तरंग >> नीलांबरी - (भाग २)

नीलांबरी - (भाग २)

पूर्वकथा: माहेरी बारशाला जाताना सासूने नीलांबरीचे दागिने काढून घेतले आणि मंगळसूत्र सांभाळण्यास सांगितले. दुर्दैवाने परतताना रस्त्यात तिचे पाच तोळ्यांचे मंगळसूत्र चोरीला गेले. भीतीने ती गळा लपवत घरी पोहोचली, पण सासूच्या नजरेतून ते सुटले नाही.

Story: कथा |
3 hours ago
नीलांबरी -  (भाग २)

"अगं बोल, आवाज का बंद झाला..? माहेरच्यांच्या डोकीवर घातलंस ना तू मंगळसूत्र.. का तुझ्या भिकारी वहिनीला भेट केलंस..?" निर्मलाबाई चिडूनच विचारीत होत्या.

"नाही." नीलांबरी हळुवार उद्गारली.

"मग कुठे आहे..?" त्यांनी देवासमोर उभं राहत विचारलं.

"चोरी झालं, येताना..!" ती एका फटक्यात सांगून मोकळी झाली.

"का s य! चोरी झालं..! कधी..? कसं..? नि तू काय झोपली होतीस..? उगाच खोटं बोलू नकोस, निमित्त करून! तुझ्या माहेरच्यांकडेच ठेवून आलीयेस ना.. आत्ता फोन करून विचारते त्यांना.." निर्मलाबाईंचा राग अनावर झाला होता.

"आई, घरच्यांना कशाला फोन करता... त्यांनी काय केलंय... त्यांना माहीत पण नाही कुठे गेलंय ते.. पाया पडते तुमच्या.." नीलांबरी त्यांच्या पायावर डोकं ठेवत त्यांना विनंती करत होती.

"असं म्हणतेस..? ठीक आहे. जोपर्यंत तू तुझ्या तोंडून खरं सांगत नाहीस.. तोपर्यंत तुझं चहापाणी-जेवणखाण सारं बंद. जा! जेवण बनव आमच्यासाठी." असं म्हणत त्या हॉलमध्ये येत टीव्ही सुरू करून नेहमीची सिरीयल पाहत बसल्या.

नीलांबरी डोळे पुसतच स्वयंपाकखोलीकडे वळली. दहा वाजत आले. राजन कामावरून घरी परतला.

"नीला, ए नीला.. जेवायला वाढ." तो हाका मारतच आला.

तिने टेबलावर ताट वाढलं. तो हातपाय धुवून टेबलाजवळ येऊन बसला.

"तू जेवलीस का?" राजनने तिच्याकडे पाहत विचारले.

"मी.."

ती काही बोलणार तोच मागाहून निर्मलाबाईंचा आवाज आला, "ती मघाशीच जेवली, माझ्याबरोबर.."

"बरं.. बरं." असं म्हणत राजनने आपलं जेवण आटोपलं.

तोवर तिने काळे मणी धाग्यात ओवून गळ्यात घातले होते.

चार दिवस होत आले. पोटात अन्नाचा कण नाही नि दिवसभराच्या कामांमुळे नीलांबरीला अशक्तपणा आल्यागत झाला होता. तरीही ती कसंबसं सारं नीट करण्याचा प्रयत्न करीत होती. कधी उपवास तर कधी लवकर जेवण आटपलं असं सांगून निर्मलाबाई राजनला टाळत होत्या.

तिन्हीसांजेची वेळ... नीलांबरी तुळशीपुढे पणती लावत होती. आज राजनला 'हाफ डे' असल्याने तो लवकर घरी परतला होता. टीव्ही चालू करीत त्याने चॅनल बदलायला सुरुवात केली. महोत्सवाचे कार्यक्रम लोकल टीव्ही चॅनलवर चालू होते. रिमोट टेबलावर ठेवीत तो पायावर पाय टाकून कोचावर रेलून बसला. आजूबाजूच्या रस्त्यावरील वाहनांची ये-जा ही त्यावर दाखवली जात होती.

नीला तुळशीला नमस्कार करून आत येत स्वयंपाकखोलीत गेली. इतक्यात त्याला नीलांबरी टीव्हीमध्ये चालताना दिसली. तो सावरून बसला. ती रस्त्यावरून चालली होती. अचानक समोरून येणाऱ्या मोटरसायकलस्वाराने तिचे मंगळसूत्र लांबवलेलेही त्यात दिसले.

"नीला, ए नीला, जरा बाहेर ये." ते दृश्य पाहताच तो नजर टीव्हीवर ठेवून ओरडला.

त्याचा आवाज ऐकून निर्मलाबाईही बाहेर आल्या. त्याने केबलवाल्याला फोन करून कार्यक्रम थोडासा 'रिवाइंड' करण्याची विनंती केली. त्यांनीही ती मान्य केली. निर्मलाबाई भान हरपून पाहत होत्या. नीला रस्त्यावरून चालत येत असताना मळकट कपडे घातलेल्या मोटरसायकलस्वाराने तिचं मंगळसूत्र खेचल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.

"म्हणजे नीला खरं बोलत होती तर!" त्या स्वतःशीच बोलत होत्या. त्या वरमल्या.

"याचा काय अर्थ आहे..? हे कधी घडलं..? माझ्या कानावर घालावसंही वाटलं नाही तुम्हाला..? एनीवे, आपण वरील कॅसेट पोलिसांत दाखवून त्याआधारे चोर पकडू शकतो." असं म्हणत तो शर्ट अडकवून बाहेर पडला. केबलवाल्यांकडून कॅसेट कलेक्ट करून तो पोलीस स्टेशनला पोहोचला.

पोलिसांनी कॅसेटच्या आधारे मागोवा घेतला. महोत्सवातील लाईट्स चोराच्या चेहऱ्यावर पडल्याने शोधणं सोपं झालं. तसंच गाडीची नंबर प्लेटही 'झूम' करताच कळाली. त्या आधारे पोलिसांनी चोराचा मागोवा घेत त्याला पकडलं.

तो बेसावध असल्याने त्याच्याच घरी पकडला गेला. जवळच्याच गावातील बेकार फिरणारा तो टपोरी होता. बारीक-सारीक चोऱ्या करण्यात त्याचा हातखंडा होता. बऱ्याच वेळा तो पुराव्याअभावी निर्दोष सुटला होता. महोत्सवातील प्रकाश योजना, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे जागोजागी बसवले असल्यामुळेच तो त्वरित पकडला गेला. पोलिसांनी हिसका दाखवताच त्यानं लपवलेलं मंगळसूत्र पोलिसांकडे दिलं. त्यातील एका चेनचा तुकडा विकून त्याने चैन केली होती.

राजन मंगळसूत्र घेऊन घराकडे परतला. रात्रीचे दोन वाजून गेले होते. निर्मलाबाई नि नीलांबरी जाग्या होत्या. मंगळसूत्र पाहून नीलांबरीचा जीव भांड्यात पडला होता. आधीच उपाशी राहिल्यामुळे 

तिला फार थकवा आला होता. ती चक्कर येऊन पडली.

निर्मलाबाईंनाही आपण नीलला चार दिवस उगाचच उपाशी ठेवलं याची चुटपुट लागून राहिली. झाला प्रकार राजनला समजला. त्याला आपल्या आईच्या स्वभावाचा अंदाज होता, पण प्रकरण अशा थराला जाईल असं वाटलं नव्हतं. चेहऱ्यावर पाणी मारताच तिला शुद्ध आली. "काहीतरी खाऊन घे," असं म्हणत निर्मलाबाईंनी वरण-भाताची प्लेट समोर ठेवावयास लावली. राजनकडून दोन घास घशात गेल्यावर तिला जरा बरं वाटलं.

"उद्या दुरुस्ती करून आणेन नि घालेन तुझ्या गळ्यात, स्वतःच्या हाताने.." असं म्हणत हसतच राजन नीलांबरीसोबत बेडरूमकडे जायला वळला. नीलांबरीही सुटकेचा निश्वास टाकीत त्याच्या मागोमाग पावलं टाकत होती. निर्मलाबाईंनीही यापुढे नीलांबरीशी चांगलं वागण्याचा निश्चय करीत त्याही आपल्या खोलीकडे जायला वळल्या.

- गौरी भालचंद्र