Home >> तरंग >> लहानांपासून थोरांना जोडणारा दुवा 'स्वान्तसुखाय'...!

लहानांपासून थोरांना जोडणारा दुवा 'स्वान्तसुखाय'...!

Story: पुस्तक |
04th July, 11:58 pm
लहानांपासून थोरांना जोडणारा दुवा 'स्वान्तसुखाय'...!

​​'स्वान्तसुखाय' अर्थातच स्वतःच्या सुखाचा शोध स्वतः घेत त्यात रममाण होणारा. हा कथासंग्रह वाचताना लेखिकेच्या या गुणाची पावलोपावली प्रचिती येते. यातील बहुतांशी कथा स्त्रीवादी असल्या, तरीही पुरुषांच्या भावभावनांना लेखिकेने तितक्याच समर्थपणे न्याय दिला आहे आणि त्यामुळेच हा कथासंग्रह आपली वेगळी छाप निर्माण करतो. या कथासंग्रहात एकूण बारा सुबक कथा आहेत. लेखिकेने मनोगतात म्हटल्याप्रमाणे 'स्वान्तसुखाय' या कथासंग्रहातील कथांमध्ये बालपणाचा गोडवा आहे, तारुण्याचा उत्साह आणि प्रौढत्वाची समज आहे. म्हणूनच हा कथासंग्रह लहानांपासून थोरांना जोडणारा दुवा ठरतो.

​या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात प्रत्येक कथेला अनुसरून समर्पक असं चित्र दिलेलं आहे; ज्यामुळे नव्याने वाचनाकडे वळणाऱ्या युवा पिढीला कथा हा प्रकार रुक्ष न वाटता हवाहवासा वाटतो. तसेच या कथासंग्रहातील भाषा साधी, सरळ व प्रवाही असून समृद्ध मराठीचा उत्तम नमुना आहे. कथा वाचत असताना प्रसंग वाचकाच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. यातील काही कथांमध्ये संवादासाठी मालवणी भाषेचा सुंदर वापर दिसून येतो. या कथासंग्रहाला आशा मनगुतकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. चित्रकार राजमोहन शेट्ये यांनी चितारलेले सुबक मुखपृष्ठ वाचकांचे लक्ष वेधणारे आहे व कथासंग्रहात स्त्री पात्रांचे सक्षमपणे प्रतिनिधित्व करणारे आहे. तसेच मलपृष्ठावरील परिचयाची कविता दखलपात्र आहे.

​लेखिकेने ग्रामीण तसेच शहरी जीवन अनुभवलेले आहे. 'नागचाफा', 'चाहूल' या कथांमधून लेखिकेचा ग्रामीण पिंड अतिशय ठळकपणे जाणवतो, तर 'ऑफिस अवर्स', 'मुरलेलं प्रेम', 'सुखाचा शोध' या कथांमधून तिचा शहरी बाज अनुभवता येतो. 'बंध राखीचा', 'साडीची ऊब', 'नात्यांची रेसिपी', ‌'आजीची सहल', 'बयो', 'उमाची खानावळ' या नात्यांभोवती फिरणाऱ्या कथा आहेत. 'नागचाफा' या पहिल्या कथेत गजाकाका आणि नागचाफ्याच्या झाडाचा अतूट बंध उलगडणारे वर्णन आले आहे; तसेच ग्रामीण भागातील स्वभावविशेष म्हणजेच पाळीव प्राण्यांशी, स्वतः लावलेल्या व जतन केलेल्या झाडांशी आपलेपणाने होणारा संवाद या कथेतून सुंदररीत्या समोर येतो.

​'बंध राखीचा' ही कथा नात्यांमधला संघर्ष दाखवते नि पुन्हा एकत्र येण्याचा सुखान्तही अनुभवायास देते. 'ब्लॅक बोर्ड' या कथेतून शिष्याच्या आयुष्यातील चांगल्या गुरूंच्या स्थानाचे महत्त्व पटते. नातं ही दोन्ही बाजूंनी तितकीच सांभाळण्याची आणि सावरून घेण्याची जबाबदारी आहे, असे 'नात्यांची रेसिपी' ही कथा वाचकांना सांगते. मुलं आपल्या शब्दांपेक्षा कृतींमधून जास्त शिकत असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'आजीची सहल' ही कथा. स्त्री जीवनाची स्थित्यंतरे आणि रक्तापल्याड मनाने जोडलेल्या नात्यांचं महत्त्व 'चाहूल' ही कथा आपल्याला समजवते. आयुष्यातील संघर्षाला जिद्दीने सामोरी गेलेली स्त्री आणि आजकालच्या जीवनातील असंवेदनशीलता 'उमाची खानावळ' या कथेमधून आपल्या प्रत्ययास येते.

​आईच्या ममतेची नि वात्सल्याची पाखर सदैव आपल्या मुलांवर असते; मात्र तिने आयुष्यात अनुभवलेल्या वाईट प्रसंगांना मुलांना सामोरं जावं लागू नये म्हणून ती वेळप्रसंगी स्वतःला कठोर बनवते आणि मुलांना शिस्तीचे धडे देऊन सक्षम बनवते. याचं प्रात्यक्षिक म्हणून डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कथा म्हणजे 'बयो'. नवरा-बायको ही संसाराच्या गाडीची दोन चाके असतात असं म्हटलं जातं. एकमेकांना समजून-उमजून संसार केला म्हणजे तो सुरळीत होतो नि एखादे वेळी मदतीची गरज लागली, तर आपल्या जवळच्या व्यक्तीकडून, मैत्रिणीकडून ती विनासंकोच घ्यावी म्हणजे गुंता सुटतो, हे सांगणारी कथा म्हणजे 'सुखाचा शोध'.

​प्रत्येकाचा त्याग वेगळ्या स्वरूपाचा असतो आणि आपल्याशी एकरूप झालेल्या जोडीदाराला, आपल्या घरासाठी राबणाऱ्या व्यक्तीला गृहीत धरले की कसा आयुष्याचा समतोल बिघडतो, हे दाखवून देणारी कथा अर्थात 'ऑफिस अवर्स'. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांच्या मध्ये येणाऱ्या तांत्रिक गोष्टी, वर्क स्पेस, करिअर यात वाहवत जाणाऱ्या नात्याला सावरण्याची कला म्हणजे 'संवाद', याविषयी मार्मिक भाष्य करणारी कथा म्हणजे 'मुरलेलं प्रेम'. या साऱ्या कथा आपल्या अवतीभवती घडत असतात. लेखिकेने आपल्या सर्जनशील कल्पनाशक्तीने या घडामोडींना सुंदर शब्दांचा साज चढवून सजवले आहे. आपल्या व्यस्त जीवनातून निवांत वेळ काढून आपल्या डोक्यातील हजारो गुंते क्षणभर का होईना विसरून जाण्यासाठी; एका क्षणभर विश्रांतीसाठी सगळ्यांनी आवर्जून संग्रही ठेवावा असा हलक्या-फुलक्या तुमच्या-आमच्या कथांचा संग्रह म्हणजे 'स्वान्तसुखाय'..!

कथासंग्रह : स्वान्तसुखाय (मराठी),   लेखिका : सौ. मंजिरी मयुरेश वाटवे

अनु देसाई