गोवा स्टाफ सिलेक्शनच्या CBT-I परीक्षा पार पडल्या असून CBT-II परीक्षा अधिक कठीण असेल. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी आणि मेरिटमध्ये येण्यासाठी 'गोव्याचा भूगोल' या विषयाचा सखोल अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.

गोवा स्टाफ सिलेक्शनच्या CBT-I परीक्षा नुकत्याच पार पडल्या. अनेकविध पोस्ट्ससाठी विविध वेळा या परीक्षा पार पडल्या. या परीक्षा दोन टप्प्यांत घेतल्या जातात. CBT-I आणि CBT-II व त्यानंतर पोस्टच्या संख्येनुसार अंतिम यादी तयार केली जाते आणि पोस्ट्स या त्या आरक्षणाच्या नियमानुसार भरल्या जातात. जीपीएससी (GPSC) तर्फे देखील CBT/CBRT-I आणि CBRT-II परीक्षा घेतल्या जातात. अगदी अलीकडेच पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी पुरुष आणि महिला दोन्ही वर्गाच्या जवळपास ४०० पोस्ट भरण्यासाठी CBT-I ही परीक्षा स्टाफ सिलेक्शन तर्फे घेण्यात आली. इंग्रजी, कोकणी, रिझनिंग आणि न्यूमेरिकल्स या विषयांवर एकूण ६० प्रश्न विचारले गेले. खूपशा विद्यार्थ्यांना ४० च्या वर मार्क्स पडलेले आहेत. त्यामुळे खूपसे विद्यार्थी CBT-II साठी पात्र ठरतील. त्यामुळे साहजिकच CBT-II परीक्षा जरा कठीणच असेल यात शंका नाही. CBT-II परीक्षेसाठी गोव्याचा इतिहास आणि काही पोस्टसाठी गोव्याचा भूगोल या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत.
रेंज फॉरेस्टर या पोस्टसाठी टेस्ट ऑफ रिझनिंग १० मार्कांना, टेस्ट ऑफ न्यूमेरिकल ॲबिलिटी १० मार्कांना, टेस्ट ऑफ इंग्लिश आणि कॉम्प्रिहेन्शन २० मार्कांना तर जनरल जिओग्राफी ऑफ गोवा या विषयाला २० मार्क्स आहेत. एकूण ७५ मिनिटांत ६० प्रश्न सोडवायचे आहेत. पोलीस कॉन्स्टेबलसाठी भूगोलाऐवजी गोव्याचा इतिहास आहे. गोव्याचा भूगोल या विषयावर अशी खास पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत, त्यामुळे नेमके काय व कोणते विषय करावेत हे विद्यार्थ्याला समजत नाही. इतिहास गोव्याचा या विषयासाठी शाळेतील ८ वी, ९ वी व १० वीची 'हिस्टरी ऑफ गोवा' आणि 'फ्रीडम स्ट्रगल' ही तीन पुस्तके वाचली की पूर्ण अभ्यास होऊ शकतो. भूगोलाबाबत तशी परिस्थिती नाही, त्याचा आपल्याला रेफरन्स घेऊन अभ्यास करावा लागतो. भूगोल या विषयात २० प्रश्न येणार असल्याने जर येथे पैकीच्या पैकी गुण घेता आले, तर मेरिटमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. मुलांनी याकडे दुर्लक्ष करू नये. इंग्रजी आणि भूगोल यात १००% स्कोअर करायला चान्सेस खूप वाढतात. गोव्यातील भूगोलाचा विचार करता खालील गोष्टींचा अभ्यास करावा:
गोव्याचे क्षेत्रफळ, जिल्हे, एकूण वाहणाऱ्या मुख्य नद्या आणि उपनद्या, गोव्यातील जमीन व तिचे प्रकार, रंग, गोव्यातील शेती-पिके, हवामान पद्धती, पडणारा एकूण पाऊस, तालुकानिहाय पिके, पाण्याचे साठे, प्राणी-पक्षी, अभयारण्ये, लोकसंख्या, हवेतील आर्द्रता, धरणे-प्रकल्प, वन्यजीव व गोव्यातील पर्यावरणीय कायदे, बायो-स्फिअर्स, खनिजे व धातू, संवर्धन योजना, विविध कायदे, म्हादईच्या सर्वोच्च न्यायालयीन तंट्याची माहिती, फ्लोरा आणि फौना, समुद्र भागातील नियम, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, प्रमुख धरणे आणि लोकसंख्या इंडेक्स, क्लायमेटिक गुंतागुंत आणि प्रदूषण, प्रमुख अन्न, संस्कृती, लोकपरंपरा, प्रमुख सण आणि त्यांचे महत्त्व, प्रमुख देवळे-चर्च, त्यांचा सामाजिक पगडा, भाषा, मतदारसंघ, भौगोलिक समस्यांसाठीच्या विविध शासकीय योजना, दूध, शेती, सोशल इंडस्ट्रीज व मुख्य उत्पादने, येथील जीडीपी, औद्योगिक क्षेत्रे, सरकारी योजना, लँड-वॉटर लेव्हल आदी विषयांवर अभ्यास करावा. आकृती ओळखावी, सर्व नुसार नोंदवलेली निरीक्षणे, गोव्याचे प्राणी, पक्षी, फूल, फळ, सण, इथले फेस्टिव्हल्स यांचाही अभ्यास करावा. मन लावून समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर ती कायमची लक्षात राहते. परीक्षेसाठी अभ्यास करू नये, स्वतःसाठी करावा. या पद्धतीने अभ्यास केल्यास भूगोलात २० पैकी २० मिळणे मुळीच अवघड नाही.
अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)