मीठाची रास

​राजवाड्यावरच मुलीचे लग्न पार पडले. लग्न झाल्यावर म्हातारी आपल्या घरी परतली. पण तिचे घर आता तिचे कुठे राहिले होते? मुलीच्या दागिन्यांपायी तिने ते घर सावकाराला विकले होते.

Story: भरजरी |
22nd August, 11:17 pm
मीठाची रास

एका गावात गरीब विधवा म्हातारी राहत होती. तिला एकुलती एक मुलगी होती. गरीब घरातली असली तरी तिची मुलगी मात्र दिसायला अत्यंत देखणी होती. टपोरे काळेभोर डोळे, चाफेकळी नाक, नितळ कातडी, बघताक्षणी कोणालाही आवडावी एवढी ती सुंदर होती. विधवा बाईने काबाडकष्ट करून लेकीला वाढवले. पण लेकीला मात्र आरामात ठेवले. तिला कधी पडलेली काठीसुद्धा उचलू दिली नाही. त्यामुळेच तिचे सौंदर्य अबाधित राहिले.

​म्हातारीची लेक दिसामासाने वाढू लागली. वयात येताच ती अधिकच सुंदर दिसू लागली. गावातल्या प्रत्येकाच्या नजरेत ती भरू लागली. गावातला प्रत्येक तरुण तिच्याशी लग्न करण्यासाठी उतावीळ होऊ लागला. पण म्हातारीला आपल्या मुलीचे लग्न तालेवार घरातच करून द्यायचे होते. त्यामुळे गावातील प्रत्येक स्थळाला म्हातारी नकार द्यायची. आपल्या मुलीला एखादा तालेवार घरातला मुलगा नक्कीच मागणी घालेल याची तिला खात्री होती. आजपर्यंत गरिबीमुळे जे आपले हाल झाले तसे हाल आपल्या मुलीचे होऊ नयेत, तिला सर्व ऐशोआराम मिळावा ही एकच म्हातारीची इच्छा होती. तिची ही इच्छा लवकरच पूर्ण 

झाली.

​गावाचा राजा आपल्या मुलासाठी योग्य स्थळ शोधत होता. आणलेले प्रत्येक स्थळ युवराजाला पसंत पडत नव्हते. त्यामुळे राजा बेचैन होता. योग्य वेळी लग्न करून पुढचा कारभार मुलाच्या हाती सोपवून स्वतः वानप्रस्थाला जाण्याचा राजाचा विचार होता. पण इकडे युवराजाला मुलगीच पसंत पडेना. शेवटी राजाने राज्यात दवंडी पिटवली. 'राज्यात ज्या विवाहयोग्य वयाच्या मुली आहेत, त्यांनी आपल्या मुलींना राजमहालात घेऊन यावे. त्यापैकी एखादी मुलगी युवराजाला आवडली तर तिचे युवराजाशी लग्न करून दिले जाईल.'

​आपल्या मुलीचे लग्न प्रत्यक्ष युवराजाशी झाल्यास ते कोणाला नको आहे? पण गरीब घरची सुंदर मुलगी असली तरी तिच्या अंगाखांद्यावर नेटके कपडे आणि चार दागिने असल्याशिवाय तिला महालात कसे बरे नेता येईल? त्यामुळे गरीब बाप काही स्थळ घेऊन राजमहालात जाऊ शकले नाहीत. मात्र नगरातील प्रत्येक धनाड्य व्यक्ती आपल्या मुलींना नखशिखान्त सोन्या-दागिन्यांनी मढवून राजवाड्यात घेऊन जाऊ लागली. पण त्यातली एकही मुलगी युवराजाच्या पसंतीत उतरेना.

​ही वार्ता म्हातारीच्या कानी पडली. ती आपल्या शेजारणीकडे बातमी खरी का खोटी हे जाणून घेण्यासाठी गेली.

“राजाने गावातल्या मुली दाखवायला आणायला सांगितले, हे खरे आहे का हो?”

शेजारीण प्रेमळ होती. म्हातारीचे कष्ट ती रोज बघत होती. तिच्या घरी लग्नाची मुलगी आहे हे शेजारणीला माहिती होते, “खरं आहे, आजी. पण तुझी मुलगी सुंदर असली तरी अशा साध्या कपड्यांवर तिला नेलेस, तर तुम्हाला राजवाड्याच्या आतसुद्धा कोणी घेणार नाही.”

“मला मनापासून वाटतं, राजपुत्राला माझी मुलगी नक्की आवडेल. पण तू म्हणतेस तेसुद्धा खरे आहे. या असल्या जाड्याभरड्या कपड्यांमध्ये आम्हाला तिथे कोण दारात उभेसुद्धा करून घेणार नाही?”

विचार करूनच म्हातारीचा उत्साह ओसरला. त्या रात्री तिने खूप विचार केला आणि मुलीच्या सुखासाठी एक निर्णय घेतला.

​सकाळी उठून म्हातारी सावकाराच्या घरी गेली. तिच्या मालकीचा एक जमिनीचा तुकडा होता आणि तिचे चार खोल्यांचे राहते घर होते. ती जमीन आणि घर तिने सावकाराला विकले. त्यातून जे पैसे आले ते पैसे घेऊन ती सोनाराच्या घरी गेली. मुलीसाठी चार ठसठशीत दागिने घेतले. विणकाराच्या घरी गेली. मुलीसाठी रेशमी तलम साडी घेतली. घरी आली. शेजारणीच्या मदतीने ती साडी मुलीला नेसवली. आणलेल्या दागिन्यांनी तिला मढवले आणि राजवाड्यात घेऊन गेली.

​“ए म्हातारे, कुठे चाललीस?” राजवाड्यात पोहोचताच दारवानाने म्हातारीला अडवले.

“राजकुमाराला माझी मुलगी दाखवायला नेतेय.”

“भल्याभल्या धनाड्य लोकांच्या मुली युवराजाने नाकारल्या, तिथे तुझ्या मुलीला पसंत करेल होय? चल, हो मागे.”

म्हातारी गयावया करू लागली. शेवटी दया येऊन दारवानाने त्या दोघींना आत सोडले. म्हातारीने आपल्या मुलीला राजकुमाराच्या पुढ्यात उभे केले. राजकुमाराला ती अत्यंत सुंदर मुलगी बघताक्षणी आवडली.

शेवटी राजकुमाराला मुलगी पसंत पडली हे पाहून राजा आनंदी झाला. त्याने नुसती साडी नेसलेल्या मुलीला आपली सून करून घेतले.

​राजवाड्यावरच मुलीचे लग्न पार पडले. लग्न झाल्यावर म्हातारी आपल्या घरी परतली. पण तिचे घर आता तिचे कुठे राहिले होते? मुलीच्या दागिन्यांपायी तिने ते घर सावकाराला विकले होते. मुलीचे धनाड्य घरात लग्न करून देण्याच्या इच्छेपायी म्हातारी स्वतः कफल्लक झाली होती. आता तिच्याजवळ ना घर होते ना जमिनीचा तुकडा. तिच्या घराच्या मागीलदारी सरपण ठेवण्यासाठी एक छोटीशी झोपडी होती. सावकाराकडे याचना करून त्या झोपडीत राहण्याची परवानगी तिने मिळवली.

सावकारानेही विचार केला, “या म्हातारीचे आयुष्य ते किती शिल्लक आहे? जिवंत असेपर्यंत राहू दे या झोपडीत.” अशा प्रकारे म्हातारीला घर सोडून आपल्या झोपडीत राहावे लागले.

​दिवस पुढे सरकत होते. राजवाड्यावर म्हातारीची मुलगी ऐशोआरामात जगत होती. अचानक मिळालेल्या या राजभोगामुळे मुलीला जुन्या दिवसांचा विसर पडला. आपल्या म्हाताऱ्या आईचा विसर पडला. तिचा प्रत्येक दिवस सुख उपभोगण्यात जाऊ लागला. पण म्हातारीचा प्रत्येक दिवस मात्र अत्यंत हालाखीत जाऊ लागला. इतके दिवस फुलाच्या पाकळीप्रमाणे जपलेल्या आपल्या मुलीचा विरह तर तिला होतच होता, शिवाय आता अंग थकले होते. पूर्वी काबाडकष्ट करून ती आयुष्य पुढे ढकलत होती; पण आता उतारवय आणि मुलीचा विरह यामुळे ती शरीराने आणि मनानेही थकली होती.

​म्हातारीच्या आणि मुलीच्या आयुष्यात पुढे काय घडते, हे पुढच्या भागात पाहू.


- गाैतमी चाेर्लेकर गावस