सह्याद्रीतील एक अद्भूत रहिवासी

दोडामार्गच्या घनदाट जंगलातील रात्रभटकंतीत आढळलेला मलबार ग्लायडिंग बेडूक रंग बदलणे, झाडांवरून ग्लायडिंग करणे आणि प्रजननासाठी पानांवर आश्चर्यकारक फेसाळ घरटे बनवण्याच्या वैशिष्ट्यांसाठी सह्याद्रीतील एक अद्भूत जीव ठरतो.

Story: साद निसर्गाची |
22nd August, 11:15 pm
सह्याद्रीतील एक अद्भूत रहिवासी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका हा जैवविविधतेने समृद्ध असा प्रदेश. जैवविविधतेने नटलेली सह्याद्रीची पर्वतरांग महाराष्ट्राच्या दोडामार्ग तालुक्यातून पुढे जाते. परवा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आम्ही रात्रभटकंतीसाठी वानोशी-कुडाशे येथे गेलो. गावामधून वाहणारी नदी, निस्सीम शांतता, घनदाट जंगल, बेडूक-पक्षी-किटकांचे चित्र-विचित्र आवाज, पांढरे-शुभ्र चांदणे, अन् ऑफ-रोडींग! ‘थ्रिलींग’ अनुभव. ‘वानोशी’ म्हणजे ‘वनाच्या कुशीत’ वसलेले. किती ‘परफेक्ट’ नाव!

रात्रभटकंतीत तसे खूप काही अनुभवायला मिळाले. पण आज आपण तलावाच्या वर एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या विशिष्ट बेडकाबद्दल जाणून घेणार आहोत. तो म्हणजे ‘मलबार ग्लायडिंग बेडूक’. चमकदार हिरव्या रंगाची कांती आणि त्वचेतून बाहेर आल्यासारखे दिसणारे मोठाले डोळे, बोटांमध्ये जाळीसारखी त्वचा आणि लांबट तोंड ही त्याची वैशिष्ट्ये. झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारताना हा बेडूक आपल्या पायांमधील जाळी पूर्णपणे पसरवतो. त्यामुळे तो काही मीटर अंतरापर्यंत नियंत्रित रीतीने घसरून जाऊ शकतो. याला ‘ग्लायडिंग’ असे म्हणतात.

मलबार ग्लायडिंग बेडूक वातावरणातील आर्द्रता, तापमान आणि प्रकाशाच्या तीव्रतेनुसार आपल्या त्वचेचा रंग बदलू शकतो. यामुळे त्याला हिरव्या पानांमध्ये लपणे सहज शक्य होते. हा बेडूक मुख्यतः रात्री सक्रिय असतो. दिवसा तो दाट पानांमध्ये लपून बसतो आणि सूर्यास्तानंतर शिकार करण्यासाठी बाहेर पडतो. मलबार ग्लायडिंग बेडूक आपले बहुतांश आयुष्य झाडांवर घालवतो. त्याच्या बोटांच्या टोकांवरील चिकट गोलाकार चकत्या त्याला गुळगुळीत पृष्ठभागावरही घट्ट पकड घेण्यास मदत करतात. ही जाळी त्याला झाडावरून घसरण्यास मदत करते. या बेडकाचे डोळे मोठे आणि बाहेर आलेले असतात. त्यामुळे रात्री कमी प्रकाशातही तो सहजपणे संभाव्य भक्षक ओळखू शकतो.

मान्सून सुरू झाल्यानंतर नर ग्लायडिंग बेडूक मोठ्या प्रमाणात सक्रिय होतात. पाणवठ्यांच्या आसपासच्या झाडांवर बसून हे मादीला आकर्षित करण्यासाठी मोठ्याने आवाज काढतात. जोडीदार मिळवण्यासाठी प्रत्येक नराची जणू स्पर्धाच लागलेली असते. या अनुषंगाने आपल्याला अनेकदा एकाच मादीभोवती अनेक नर जमलेले दृष्टीस पडतात.

‘फेसाळ घरटे’ हे मलबार ग्लायडिंग बेडकाचे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. मादी बेडूक प्रजननासाठी पाणवठ्याच्या वर लोंबकळणारी पाने किंवा फांद्या निवडते. अंडी घालताना नर आणि मादीच्या शरीरातून चिकट द्रव स्रवतो. नर आपल्या मागील पायांच्या साहाय्याने हा द्रव फेटून दाट फेस तयार करतो. या फेसामध्ये मादी शेकडो अंडी घालते. एका घरट्यात साधारण २०० पेक्षा अधिक अंडी असू शकतात.

घरटे तयार झाल्यानंतर नर तेथून निघून जातो. मादी अत्यंत काळजीपूर्वक आजूबाजूची पाने गोळा करून फेसाळ घरट्यावर झाकण तयार करते आणि संपूर्ण घरटे लपवते. घरटे लपवल्यामुळे अंड्यांचे सूर्यप्रकाश, पाऊस आणि शिकाऱ्यांपासून रक्षण होते. हा फेस अंड्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. काही दिवसांनी अंड्यांतून बाहेर आलेले टॅडपोल्स (बेडकाची पिले) थेट खाली असलेल्या पाण्यात पडतात आणि त्यांची पुढील वाढ सुरू होते.

आज जंगलतोड, जलस्रोतांचे प्रदूषण, शहरीकरण आणि हवामान बदल यामुळे या प्रजातीच्या अधिवासावर परिणाम होत आहे. विशेषतः प्रजननासाठी आवश्यक असलेली झाडे आणि पाणवठे नष्ट झाल्यामुळे मलबार ग्लायडिंग बेडकाच्या जीवनचक्रावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे.


- स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)