दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ५०० खाटा उपलब्ध असून पूर्ण क्षमतेने हे इस्पितळ सुरू असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. सध्या दीड हजारांपेक्षा जास्त रुग्ण दरदिवशी येत असून इस्पितळात मजले रिक्त आहेत. त्या ठिकाणी आणखी खाटांची सोय करून ही कमतरता भरून निघू शकते. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता असून तसे झाल्यास एकही रुग्ण व्हीलचेअरवर उपचार घेताना दिसणार नाही.
दक्षिण गोव्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यासाठी बदलते वातावरण, नागरिकांचा स्वच्छता मोहिमेतील अल्प सहभाग व इतरही कारणे असू शकतात. पण साथरोग पसरल्यानंतर रुग्ण इस्पितळात आल्यावर त्यांना योग्य उपचार व साधनसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील राहणे हे सरकारचे कर्तव्य आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी सांगितले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांची संख्या जास्त असते. इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून खाटा भरलेल्या असल्या तरी कोणालाही उपचाराविना परत पाठवले जात नाही. रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर नवीन रुग्णाला खाट उपलब्ध करून दिली जाते.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील ५०० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. पावसाळ्यात काही साथरोगांमुळे रुग्णांमध्ये वाढ होते व त्यावेळी आणखी काही खाटांची आवश्यकता असते. पण आरोग्य केंद्रांसह जिल्हा इस्पितळ आवश्यकतेनुसार कार्यरत आहे. ऊन-पावसाच्या खेळामुळे डासउत्पत्ती वाढून साथरोगाच्या रुग्णांत वाढ होत आहे. इस्पितळाची क्षमता नसतानाही आवश्यकतेनुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. अशाच प्रकारची स्थिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळातही आहे. पण रुग्णांना उपचार नाकारण्यात येत नाहीत. काही रुग्ण व्हीलचेअरवर व ट्रॉलीवर दिसतात, पण आधीच्या रुग्णांना दुपारी दोन वाजेपर्यंत डिस्चार्ज दिल्यानंतर त्या रुग्णांनाही खाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पावसाळ्यातील वातावरणातील बदलाचा परिणाम शरीरावर होत असतो, त्याचवेळी साथरोगही पसरतात. या कालावधीत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळावरील रुग्णांचा भार वाढलेला आहे. सध्या दरदिवशी दीड हजारांपेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी येत आहेत.
दरदिवशी येणाऱ्या रुग्णांची संख्या, ओपीडीतील रुग्ण व दाखल करून घेतल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा रुग्णांचा आकडाच लोकांचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या कार्यक्षमतेवर विश्वास असल्याचे दाखवून देतो. त्यांना चांगली सेवा मिळू शकते असे लोकांना वाटत असल्याने ते येत आहेत, असा दृष्टिकोनही वैद्यकीय अधीक्षकांनी मांडला. पण वास्तव्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी लोकांना सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसतात, पण त्यांना सरकारची साथ मिळत नाही हीच खंत आहे.
साथरोगाच्या पार्श्वभूमीवर परिसरात स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही नागरिकांचीही आहे. घरासह परिसरात पाणी साठू नये यासाठी लोकांनीही काळजी घ्यावी. ताप येत असल्यास तत्काळ आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात उपचारासाठी यावे. केवळ आरोग्य खात्याकडून उपाययोजना केल्याने साथरोगावर नियंत्रण येणार नाही, तर यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्व काही आरोग्य खात्यानेच केले पाहिजे असा विचार केल्यास साथरोग नियंत्रणात येणार नाही, हेही तितकेच खरे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील अधिकारी व कर्मचारी लोकांना चांगली सेवा देत आहेत. पण रुग्णांना आवश्यक जादा खाटा, औषधे यासह जादा कर्मचाऱ्यांची सोय सरकारकडून करण्याची गरज आहे. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर इस्पितळातील साधनसुविधांचा आढावा घेत त्यात वाढ करण्याची गरज आहे. हॉस्पिसिओतील रुग्णांचा वाढता भार कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण करत आहे. राज्य सरकारकडून नव्या सुविधा आणल्या जातात पण त्यासाठी नवा स्टाफ भरती केला जात नाही. जे उपलब्ध आहेत, त्यातीलच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नव्या सुविधेसाठी जुंपले जातात. सरकार केवळ सुविधा देत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करते. एकीकडील खड्डा बुजवताना दुसरीकडे खड्डा खणण्याचे हे काम सुरू आहे. यामुळे प्रश्न सुटत तर नाहीतच, उलट नवे प्रश्न निर्माण होत आहेत.
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अभावामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत गेला. डेंग्यूची प्रकरणे वाढत गेल्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून साथरोगाबाबत जागृती करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. सुरुवातीलाच आवश्यक जागृती झाली असती तर लोकांनीही काळजी घेतली असती. पण तसे झाले नाही. परिस्थिती हातातून निसटू लागताच पळापळ सुरू झाली. मलेरियाच्या बाबतीतही आरोग्य विभाग असाच प्रकार करत आहे. दरवर्षी 'शून्य मलेरिया रुग्ण' दाखवून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करत शाबासकी घेण्याचा प्रकार योग्य नसल्याचे जिल्हा बैठकीत गोवा कॅनचे रोलंड मार्टिन्स यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. आरोग्य विभागाची ही लपवाछपवी अंतिम क्षणी लोकांना महागात पडते.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील कर्मचाऱ्यांकडून येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवा दिली जात आहे. पण रुग्णसंख्या वाढल्याने कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. खाटांची कमतरता भासत आहे. त्यामुळे या सुविधा सरकारने पूर्ण करण्याची गरज आहे. डेंग्यू रुग्ण आढळलेल्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फॉगिंग, औषध फवारणी आणि रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा व औषधांचा साठा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याशिवाय रुग्णांना प्लेटलेट्सची आवश्यकता असते पण तेही तत्काळ उपलब्ध होत नाहीत. या सोयीसुविधांत वाढ करण्यासाठी आरोग्य खाते व सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. इस्पितळाची क्षमता ५०० असून पूर्ण दक्षिण गोव्यासाठी ही पुरेशी नाही. एमआरआय व इतर सुविधा सुरू करण्यात येत आहेत ही चांगली गोष्ट, पण त्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येऊ देणे चुकीचे आहे. इस्पितळाच्या इमारतीतील दोन मजल्यांवर नर्सिंग कॉलेज आणण्यासाठी आरोग्य खाते प्रयत्न करत आहे. पण जर रुग्णांना खाटांची कमतरता भासत असेल, तर त्या जागेचा वापरही रुग्णांसाठी सोयी उभारणीसाठी होणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी खाटांची सोय करून त्या प्रमाणात एमटीएस, परिचारिका व इतर कर्मचारी संख्येत वाढ करण्याची गरज आहे. हे सर्व शक्य होऊ शकते, पण त्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसे न झाल्यास भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. खासगी इस्पितळातील खाटाही आता साथरोगाच्या परिस्थितीत भरलेल्या आढळून येत असल्याने वेळीच सुविधांमध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सरकारने हाती घेण्याची आवश्यकता आहे.

- अजय लाड, (लेखक गोवन वार्ताचे दिक्षण गोवा ब्युरो चीफ आहेत.)


